इस्लामपूर : पंचायत समितीच्या सभेला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत संतप्त सदस्यांनी ही सभा घेण्यात येऊ नये, असा आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहातून फोनाफोनी झाल्यानंतर बांधकाम, वीज वितरण व इतर शासकीय अधिकारी आल्यानंतरच शुक्रवारी ही सभा सुरू झाली.
पंचायत समिती सभागृहात सभापती शुुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या उपस्थितीत ही सभा झाली.
देवराज पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर ताशेरे ओढले. अधिकारी येणार नसतील तर सभाच घेऊ नका. जे अधिकारी येणार नाहीत, त्यांच्या वरिष्ठांना कळवा. तसेच ज्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसते अशा अधिकाऱ्यांना सभेसाठी पाठवू नका, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.
ज्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी इस्लामपूरला येतात, त्या गावातून एसटी बससेवा तत्काळ सुरू करण्याची सूचना करण्यात आली. तालुक्यात रस्त्यालगत असणाऱ्या शाळा परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचा निर्णय झाला. पंचायत समितीला प्राप्त झालेल्या निधी ३१ मार्चपूर्वी पूूर्ण खर्च करण्याबाबत चर्चा झाली. कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी विविध योजनांची माहिती दिली. घरकुले पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत शंकर चव्हाण, रूपाली सपाटे, आनंदराव पाटील, पी.टी. पाटील, धनश्री माने, माजी सभापती सचिन हुलवान यांनी भाग घेतला.