सांगली : तासगाव येथील गणपती पंचायतन ट्रस्टची हजारो एकर जमीन जिल्ह्याच्या विविध भागांत आहे. या जमिनींचा ट्रस्टीने ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हावे लागणार आहे. म्हणून ट्रस्टीचा जमीन लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.किसान सभेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थान विलीन झाली; पण खासगी मालकी आहे तशीच राहिली. त्यामुळे जिल्ह्यातील संस्थानिकांनी त्यांच्याकडे असणारी जमीन ट्रस्ट ॲक्टखाली नोंद करून शेतकऱ्यांना खंडाने दिली. सध्या या ट्रस्टींनी शेतकऱ्यांकडील जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे सात-बारा उताऱ्यावर देवस्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद झाली. आजही तशी नोंद आहे. खंडकऱ्या शेतकऱ्यांची नावे संरक्षित कूळ म्हणून इतर हक्कात होती. पाठीमागील दोन वर्षांपासून सदर नावे कमी केली आहेत. उताऱ्यावर कोणत्याही जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर नाहीत. शेतकऱ्यांची नावे कमी झाल्याचा फायदा ट्रस्टींनी घेतला आहे. तसेच या जमिनीचा ९९ वर्षांच्या कराराने लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून आम्ही मागणी करतो की सदर जमिनीचा लिलाव जाहीर करणाऱ्या ट्रस्टीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसेच सध्याची लिलाव प्रक्रिया रद्द करून कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पूर्ववत सात-बारा उताऱ्यावर नोंद झाली पाहिजे, या मागणीचे निवदेन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश पाटील, सचिव गुलाब मुलाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी भूमिहीन होतील : उमेश देशमुखशेतकऱ्यांकडे संस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीचे लिलाव करून ९९ वर्षांने दिले तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून बेकायदेशीर लिलाव रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उमेश देशमुख यांनी केली आहे.