अवैध धंद्यांवर कारवाई करा; अन्यथा आम्ही बंद पाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:10+5:302021-03-17T04:27:10+5:30
ओळी :- सांगली : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात तत्काळ कारवाई करावी; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण ...
ओळी :-
सांगली : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात तत्काळ कारवाई करावी; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे अवैध धंदे बंद पाडले जातील, असा इशारा जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुखांना देण्यात आले.
सावंत म्हणाले की, शहरातील मुख्य चौकात मटक्याचे अड्डे चालू आहेत. गुटखा, व्हिडिओ गेम, जुगार व इतर अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यामुळे युवा पिढी गुन्हेगारीच्या मार्गाने जात असून कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी अवैध धंदे बंद केले होते; पण त्यांच्याच तासगावात मनसेच्या महिलांनी मटका अड्डा उद्ध्वस्त केला. आता राष्ट्रवादीचे गृहमंत्री व पालकमंत्री आहेत. त्यांच्या काळात जिल्ह्यात मटका व गुटखा खुलेआम चालू आहे, ही लाजिरवाणी बाब आहे.
अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी होऊनही पोलीस प्रशासनाकडून त्यांची कोणतीही दखल घेतली जात नाही. जिल्ह्यातील अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावेत, अन्यथा मनसेच्या वतीने ते बंद पाडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.