गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची विविध गुणवैशिष्ट्ये हळूहळू जगासमोर येताहेत. त्यापैकीच एक म्हणजे अनियंत्रित मधुमेहामुळे कोरोनाग्रस्तांचे जाणारे बळी. जागतिक अभ्यासानुसार मधुमेही सध्या कोविड संक्रमणाला त्वरित बळी पडतात. त्यांच्यात कोरोनाची तीव्रता वाढते. सर्वसामान्य रुग्णांपेक्षा मधुमेहींचा मृत्युदर दहापटींनी वाढतो. जसा मधुमेहामुळे कोरोना अधिक फैलावतो, तसाच कोरोनामुळेही मधुमेह वाढत असल्याचे निष्कर्ष आहेत. कोरोनाबाधितांपैकी ३० टक्के रुग्णांची रक्तशर्करा वाढते, त्यातील अनेकांना कोरोनातून बाहेर पडल्यावरही मधुमेह कायमचा चिकटतो. कोरोनाकाळात मधुमेहाची गुंतागुंत, उदा. केटॉसिस, कोमा, मूत्रपिंड निकामी होणे असे अन्य विकार बळावतात. त्यामुळे मधुमेहींची जबाबदारी अधिक वाढते.
मधुमेहींनी रक्तशर्करा घरच्याघरी ग्लुकोमीटरने आठवड्यातून एकदा मोजावी. भरपूर पाणी, पुरेसा पौष्टिक आहार, ३०-४० मिनिटे चालण्याचा व्यायाम, प्राणायाम याची सवय मधुमेहींसाठी सुरक्षाकवच ठरू शकते. आहारात अ, क, ड जीवनसत्वे व झिंक मूलद्रव्यांची कमतरता असेल तर सप्लिमेन्टसद्वारे भरून काढणे कधीही फायद्याचे. मधुमेहीला कोरोना ग्रासलेच तर मात्र अत्यंत काळजी घ्यावी लागते. घरगुती विलगीकरणात राहिल्यास तोंडावाटे घ्यायच्या अैाषधांत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदल करावेत. गरजेनुसार इन्शुलीनचे इंजेक्शन घ्यावे. रक्तातील साखर वरचेवर मोजावी. कोविड रुग्णालयात दाखल करताना मधुमेहाची औषधे बंद करून इन्शुलीन टोचले जाते. कोरोनामुळे अनेकांना न्युमोनिया होतो. दाहसदृश स्थिती निर्माण होते. अशावेळी स्टेरॉइडस द्यावी लागतात. त्यामुळेही रक्तातील साखरेची मात्रा वाढते. या काळात जेवणानंतर रक्तातील साखर १४० ते १८० मिलीग्राम राहील याकडे लक्ष ठेवावे.
मधुमेहातील गुंतागुंत, रक्त गोठणे, दाहसदृश स्थिती यावर नियमित लक्ष हवे. बोटाला ऑक्सिमीटर लावून सहा मिनिटे चालावे, ऑक्सिजनचे प्रमाण किती कमी होते याची नोंद घ्यावी. मधुमेह नसलेल्या कोरोनाग्रस्तांनी बरे झाल्यावर पुढील सहा महिने अत्यंत काळजी घ्यावी. यातील २० टक्के लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक आहे.
(लेखक मिरजेतील मधुमेह व आंतर्ग्रंथी तज्ज्ञ आहेत).