इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तालुक्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या पाच गावांना पुन्हा भेटी दिल्या. संसर्ग वाढण्याची कारणे आणि स्थानिक दक्षता समित्यांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचे निर्देश त्यांनी दिले.
डुडी यांनी आठवडाभरापूर्वीच तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या होत्या. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यांनी पुन्हा साखराळे, साटपेवाडी, वाळवा, भडकंबे, बागणी या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी स्थानिक जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच-उपसरपंच यांच्याशी चर्चा केली.
जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या गावांमधील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या जवळून संपर्कातील लोकांची यादी सविस्तर घ्यावी. जवळच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांची चाचणी करा. चाचणीची ही संख्या १५ पेक्षा कमी असू नये. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या १०० मीटर परिसरातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या. यामुळे छुपे कोरोना स्प्रेडर सापडण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासगी डॉक्टरांकडून प्राप्त होणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करून त्याबाबत पुढील कारवाई करावी. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरांमध्ये गृह विलगीकरणाची सोय नाही, अशा सर्व लोकांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याचे आदेश डुडी यांनी दिले.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील उपस्थित होते.