लिंगनूर : आरग (ता. मिरज) येथील एज्युकेशन सोसायटीचे आरग हायस्कूल व ज्युनिअर कॉजेलमध्ये शिकविणाऱ्या एका शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या संस्थेतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. यामुळे संस्थेने येथील शाळा, ज्युनिअर कॉलेजचे वर्ग बंद केले आहेत.
या संस्थेतील एका प्राथमिक वर्गाला शिकविणारा शिक्षक दि. २८ मार्च रोजी कोरोनाबाधित आढळला होता. बाधित शिक्षकाच्या संपर्कातील आठ जणांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. संपर्कातील एका शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या महिन्यात दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर अकरावी व बारावीला शिकविणारी शिक्षिका कोरोनाबाधित आढळल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे. सध्या तरी बाधित शिक्षिकेला कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु, होम आयसोलेशनद्वारे उपचार सुरू आहेत.
कोट
मागील महिन्यात या संस्थेतील एक प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सध्या शाळा बंद आहे. मात्र संपर्कातील पुन्हा एक शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. संपूर्ण शाळेचा परिसर, वर्गखोल्यांचे सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला दिल्या आहेत. शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
- डॉ. नितीन चिकुर्देकर, वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, आरग.