दहावीच्या परीक्षा रद्द, पण पुढील प्रवेशाचा सगळाच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:24 AM2021-05-16T04:24:22+5:302021-05-16T04:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावीची परीक्षा रद्द झाली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, पुढील प्रवेश, सीईटी या सर्वच बाबतीत गोंधळात गोंधळ आहे. दहावीनंतरचे विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया संभ्रमावस्थेत आहे.
शासनाने सामायिक प्रवेश परीक्षा सुचित केली असली तरी त्याच्याही हालचाली नाहीत, त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक सारेच गोंधळात आहेत.
चौकट
आयटीआय, डिप्लोमाचे प्रवेश कसे होणार?
दहावीनंतर डिप्लोमा व आयटीआय प्रवेशासाठी चढाओढ असते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी मुलांचे मूल्यांकन झालेले नाही, त्यामुळे या शिक्षणक्रमांची प्रवेशप्रक्रिया अधांतरीच आहे. शासनाने सीईटी त्वरित घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची शिक्षण संस्थांची मागणी आहे. तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार डिप्लोमाचे प्रवेश होतील; पण परिषदेनेही अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. दहावीबाबतचा निर्णय लवकरात लवकर कळवा, अशी विनंती परिषदेने शासनाला व दहावी बोर्डाला केली आहे. आयटीआयला मात्र दहावीच्या अधिकृत निकालाची प्रतीक्षा आहे.
चौकट
ऑनलाइन सीईटी ठरेल फार्स
दहावीनंतरची सीईटी ऑनलाइन घेतल्यास तो फार्स ठरण्याची भीती आहे. गुणवान मुलांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन सीईटीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. दहावीला बोर्ड परीक्षेऐवजी थेट ऑनलाइन परीक्षा समोर आल्याने मुलांचा गोंधळही उडणार आहे. शिवाय वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी एकच सीईटी कितपत व्यवहार्य ठरेल? असाही शिक्षणतज्ज्ञांचा प्रश्न आहे.
चौकट
ऑफलाइन परीक्षेला कोरोना आडवा
सीईटी ऑफलाइन घ्यायची तर त्याला कोरोना आडवा येत आहे. परीक्षेसाठी गर्दी कशी टाळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या कोरोना उच्चांकी पातळीवर आहे, शिवाय तरुणांना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. या स्थितीत ऑफलाइन परीक्षेसाठी पालक तयार होणार का? हादेखील प्रश्न आहे.
चौकट
अंतर्गत मूल्यमापनाविषयी सूचना नाहीत
- दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले, पण त्यांच्या मूल्यांकनाविषयी काहीही मार्गदर्शक सूचना बोर्डाकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे दहावीचे शिक्षक व शाळांमध्ये संभ्रम आहे.
- विद्यार्थ्यांच्या गुणांकनाविषयीचा आदेश सोमवारी (दि. १६) येण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षभरात कोणतीच परीक्षा झाली नसल्याने गुणांकन कसे होणार, याविषयी उत्सुकता आहे.
पॉईंटर्स
अशी आहे प्रवेश क्षमता
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा - २६४
अकरावी प्रवेश क्षमता - ४५,९६०
शिक्षक व प्राचार्य म्हणतात...
दहावीचा निकाल निश्चित नसल्याने आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. दरवर्षी दहावीचे निकाल लागताच जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुुरू होते. यंदा शासनाने दहावीचे मूल्यांकन जाहीर केले असले तरी अद्याप गुण किंवा टक्केवारी स्पष्ट झालेली नाही. ती जाहीर झाल्यावरच आयटीआयचे प्रवेश सुरू होतील. सीईटी घेतली तरी आयटीआयसाठी काय अभ्यासक्रम असेल हा प्रश्न आहे.
- प्रमोद दहीवडे, आटीआय शिक्षक, सांगली.
दहावीचे मूल्यांकन कधी जाहीर होईल, याची आम्हाला प्रतीक्षा आहे. तंत्रशिक्षण बोर्डाच्या सूचनांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. दहावीनंतरची सीईटी लवकरात लवकर घेतली, तर डिप्लोमाचे प्रवेशही मार्गी लागतील. सीईटी घेताना डिप्लोमासह सर्वच शिक्षणक्रमांसाठी उपयुक्त प्रश्न त्यामध्ये असतील, याची काळजी घ्यायला हवी.
- प्रा. अमोल विभुते, प्राध्यापक, महिला तंत्रनिकेतन, तासगाव.
दहावीच्या निकालासाठी वेळ घालविण्याऐवजी प्रवेशासाठी फॉर्म भरून घेण्याचे काम सुुरू करा, असे शासनाला सुचविले आहे. सीईटी ऑनलाइन घेतली तर ती घरातून होऊ नये, त्यामुळे पारदर्शकता राहणार नाही. स्पर्धा परीक्षा केंद्रांप्रमाणे सेतू किंवा अन्य केंद्रांवर ती व्हायला हवी. कोरोनाची काळजी घेऊन टप्प्याटप्प्याने सीईटी घेता येईल. वेळ न घालवता सीईटीबाबतचा निर्णय तातडीने व्हावा.
- प्रा. नारायण मराठे, विभाग प्रमुख, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली.