दिलीप मोहिते
विटा : विटा शहरात कोष्टी समाजाचा पारंपरिक विणकामाचा व्यवसाय म्हणून परिचित असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ११९ वर्षांचा इतिहास असून डबरी माग ते सध्याचा यंत्रमाग असा याचा प्रवास झाला आहे. प्रतिदिन ४ लाख ५० हजार मीटर कापड उत्पादन होत असून, ग्रामीण भागातील चार हजारावर कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे भिवंडी, इचलकरंजी व मालेगावपाठोपाठ विटा शहरातील हा यंत्रमाग व्यवसाय सध्या नावारूपास येऊ लागला आहे.
विटा शहरात कोष्टी समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय असून १९०० ते १९५० पर्यंतच्या काळात डबरी मागाची सुधारित आवृत्ती म्हणून हातमाग आले. त्यावर लुगडी व रंगीत साडीचे उत्पादन घेतले जात होते. त्यानंतर मात्र १९६० च्या सुमारास शहरात विजेवर चालणारा पहिला यंत्रमाग शहरातील चार ते पाच लोकांनी एकत्रित येऊन बसविला. त्यानंतर यंत्रमागांची संख्या हळूहळू वाढत गेली. १९६७ पर्यंत यंत्रमाग वाढीची संख्या गतीने सुरू होती. परंतु, केंद्राने यंत्रमागावर रंगीत साडी विणण्यास बंदी घातली.
विटा शहरात यंत्रमागांची संख्या सुमारे ६ हजार आहे. त्यावर ग्रामीण भागातील चार हजाराहून अधिक कामगार काम करीत आहेत. दररोज ४ लाख ५० हजार मीटर कापड उत्पादन होत असून त्यांची बाजारपेठेतील किंमत १ कोटी २० लाख रूपये आहे. हे तयार झालेले सर्व पॉपलीन कापड राजस्थानातील पाली व बालोत्रा येथे पाठविले जात आहे. तेथे त्या कापडावर रंग प्रक्रिया व छपाई काम केले जाते. खानापूरसारख्या दुष्काळी भागात रोजगाराची मोठी क्षमता असलेल्या व राज्य व केंद्र सरकारला कररूपाने महसूल मिळवून देणाºया या यंत्रमाग व्यवसायाचे अस्तित्व कायम आहे.
सवलतींची गरजयंत्रमाग व्यवसाय नेहमीच तेजी-मंदीच्या चक्रव्यूहात सापडतो. कररूपाने महसूल व कष्टकरी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी या व्यवसायाला देण्यात आलेल्या सवलतींचा प्रादेशिक भेदभाव दूर करून समान सवलत देणे गरजेचे असल्याचे यंत्रमागधारकांनी सांगितले.