इस्लामपूरच्या ठकसेन मारुती जाधवला पाच दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:20+5:302021-08-19T04:30:20+5:30
इस्लामपूर : बेकायदा बचतगट स्थापन करून पतसंस्थेपेक्षा २० ते २५ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ५० ते ६० ...
इस्लामपूर : बेकायदा बचतगट स्थापन करून पतसंस्थेपेक्षा २० ते २५ टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ५० ते ६० महिलांची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ठकसेन मारुती अरुण जाधव याला येथील न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मारुती जाधव विरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी तेजश्री संजय पाटील (वय ४८, रा. लोणार गल्ली, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. मारुती जाधव याने ५ वर्षांपूर्वी रेणुकामाता हा बेकायदा बचतगट स्थापन करताना ५० ते ६० महिलांना मोठ्या लाभाचे आमिष दाखविले. या महिलांचा पैसा भरपूर नफा असणाऱ्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात लावून पतसंस्थेपेक्षा २० ते २५ पट अधिक परतावा देण्याचा वादा केला होता. त्यासाठी त्याने पासबुकही छापून घेतली होती. महिलांकडून येणारी रक्कम या पासबुकमध्ये नोंदवून घेत त्याने महिलांचा विश्वास संपादन केला होता.
ठकसेन मारुती जाधवने स्वत:च्या सख्ख्या बहिणीला फसविल्यानंतर त्याचे कारनामे समोर येऊ लागले. त्यातूनच या महिलांचीही त्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या बचतगटाच्या महिलांकडून मारुती जाधवने १० हजारांपासून ३ लाख ७५ हजार रुपयांपर्यंतच्या रक्कमा उकळल्या आहेत. बहिणीला फसविलेल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र काटे अधिक तपास करत आहेत.