पंधरा हजारांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांचा उद्रेक, सांगली जिल्हा परिषदेत गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 12:57 PM2024-12-11T12:57:37+5:302024-12-11T12:58:44+5:30
अर्जस्वीकृती अचानक थांबविल्याने हवालदिल
सांगली : पदवीनंतरही अपेक्षित नोकरी मिळत नसल्याचा उद्रेक सोमवारी जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला. १५ हजार रुपये मानधनाची कंत्राटी नोकरभरती अचानक थांबविल्याने उमेदवार आक्रमक झाले. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला; पण गायकवाड यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडत समुपदेशन केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत १३६ कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत होती; पण पाच दिवस अगोदरच प्रशासनाने अर्जांची स्वीकृती अचानक थांबविली. तसे आदेश शासनाकडून आले होते. याची माहिती मिळताच दुपारपासूनच मोठ्या संख्येने बेरोजगार तरुण जिल्हा परिषदेत गोळा झाले. शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या कक्षाबाहेर गर्दी केली.
सायंकाळी गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी हवालदिल झालेल्या तरुणांनी गायकवाड यांच्याकडे भरती प्रक्रिया अचानक का थांबविली, याची विचारणा केली. दोन टप्प्यांत भरलेले अर्ज वेगवेगळे ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, असेही सांगितले. एकाच वेळी पन्नासभर युवक-युवतींनी गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण होते. गायकवाड यांनी त्यांचे पूर्ण समाधान केले. ते म्हणाले, भरतीसंदर्भात शासन नव्याने निर्णय घेणार आहे. दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांत कंत्राटी स्वरूपात शिक्षकनियुक्ती केली जाणार आहे. अशा शाळांच्या गावातील स्थानिक पात्र उमेदवारांनाच सर्वोच्च गुणवत्तेनुसार नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.
१३६ जागांसाठी ३००० अर्ज आल्याने गुणवत्ताच प्रमुख निकष असणार आहे. त्या जागेवर कायम शिक्षक नियुक्त होताच कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती आपोआप संपुष्टात येणार आहे. शासनाने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवली असली, तरी आम्ही जिल्हा परिषद स्तरावर ते स्वीकारत आहोत. त्याबाबतचा पुढील निर्णय वरिष्ठ घेतील. त्यामुळे तरुणांनी कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. संयम बाळगावा. कोणावरही अन्याय किंवा कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. गायकवाड यांच्या खुलाशानंतर तरुण पांगले.
बेरोजगारांची रेटारेटी
१५ हजार रुपये मानधनाची ही नोकरी कंत्राटी आहे. या जागेवर नियमित शिक्षक कधीही येऊ शकतो. तो येताच कंत्राटी तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे. तरीही अवघ्या काही महिन्यांच्या बेभरवशी नोकरीसाठी तरुणांची रेटारेटी सुरू आहे. फक्त १३६ जागा असतानाही हजारो तरुण त्यासाठी धावले आहेत.