प्रेम प्रकरणातून पळालेल्या प्रियकराच्या वडिलाचा मारहाणीत मृत्यू, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:48 AM2024-01-18T11:48:58+5:302024-01-18T11:49:22+5:30

प्रेयसीच्या आई-वडिलांसह बारा जणांवर गुन्हा, सात अटकेत

The father of a lover who ran away from a love affair was beaten to death, Shocking incident in Sangli district | प्रेम प्रकरणातून पळालेल्या प्रियकराच्या वडिलाचा मारहाणीत मृत्यू, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

प्रेम प्रकरणातून पळालेल्या प्रियकराच्या वडिलाचा मारहाणीत मृत्यू, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मांगले : मांगले ( ता. शिराळा ) येथे प्रेम प्रकरणातून युगुलाने पलायन केल्यानंतर मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाइकांनी विजेच्या खांबाला दोरीने बांधून व आईला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय ५५, रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, मुलीचे आई-वडील, भाऊ यांच्यासह बारा जणांविरुद्ध शिराळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील व शुभांगी प्रवीण पाटील या तीन महिलांसह सात जणांना अटक केली आहे. अन्य पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद मृत दादासाहेब यांची पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनटेक वसाहत येथे दादासाहेब चौगुले यांचे जनांवरांचे शेड आहे. तर त्याच्या जवळच सुरेश पाटील यांचे राहते घर आहे. मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीस बुधवारी पहाटे प्रेमसंबधातून नेले होते. त्यानंतर दादासाहेब चौगुले व त्यांची पत्नी राजश्री नेहमीप्रमाणे हे पहाटे दुचाकीवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी शेडवर गेले होते.

दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ‘आमच्या मुलीस तुमच्या मुलाने पळवून नेले आहे, ते कोठे आहेत सांगा, असा जाब विचारला. दादासाहेब यांनी ‘आम्ही आताच आलो आहोत, आम्हाला माहिती नाही’, असे सांगितले त्यावेळी संजय व सुरेश पाटील, अन्य पाच जणांनी त्यांना मारहाण करत विजेच्या खांबाला बांधले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर रवींद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर, कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, प्रवीण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (रा. मांगले) यांनी चौगुले दांपत्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दादासाहेब यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद पत्नी राजश्री चौगुले यांनी दिली आहे.

गावात तणाव

मारहाणीत दादासाहेब बेशुद्ध पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर नातेवाइकांनी शिराळा पोलिस ठाण्यासमोर जमा होत, जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तीन महिलांसह सात अटकेत

चौगुले यांच्या नातेवाइकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुलीचे वडील सुरेश पाटील, चुलते संजय पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाडळकर या चौघांना अटक केली. तर, कविता पाटील, पद्मा पाटील, शुभांगी पाटील यांना उशिरा अटक केली. प्रवीण पाटील, सनीराज पाटील, संग्रामसिंग पाटील, सचिन पाटील, अजय पाटील यांचा शोध सुरू आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या गणेश व त्याची प्रेयसी शिराळा पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनाही हकीकत ऐकून धक्काच बसला. उत्तरीय तपासणीनंतर चौगुले यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The father of a lover who ran away from a love affair was beaten to death, Shocking incident in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.