सांगली : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याविरोधात शरद पवारांनी केलेल्या बंडाचा विषय दादांनी त्याचवेळी मनातून काढून टाकला होता. आम्ही आजपर्यंत कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही, असे दादांचे नातू व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात भाजप व राष्ट्रवादीत सध्या वाकयुद्ध सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीतील ९ आमदार फुटल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.वसंतदादांचे नातू म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या फुटीकडे कसे पाहता, असा प्रश्न विशाल पाटील यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, वसंतदादांचे सरकार पाडले तेव्हा त्याच्या वेदना त्यावेळी त्यांच्यासह पक्षातील सर्वच नेते, कार्यकर्त्यांना झाल्या होत्या. पण, वसंतदादांनी कधीही बदल्याच्या भावनेने राजकारण केले नाही. त्यांनीच तो विषय सोडून दिला. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही कधीही तशी भावना जपली नाही. काँग्रेसमध्येही तशी परंपरा नाही. त्यामुळे या घटनेकडे आम्ही कधीच बदल्याच्या भावनेने पाहणार नाही.काँग्रेस पक्षाच्या विचाराने व आदेशाने यापुढे आम्ही वाटचाल करू. महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांच्या पाठीशी राहायचा निर्णय पक्षाने घेतला तर आम्ही त्याचे पालन करू, असे त्यांनी सांगितले.
वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला
By अविनाश कोळी | Published: July 03, 2023 6:51 PM