कृष्णा नदीपातळीत मंदगतीने होतेय घट, पावसाचा जोर ओसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:23 PM2022-07-18T16:23:30+5:302022-07-18T16:24:02+5:30
येत्या सहा दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
सांगली : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीच्यापाणीपातळीत मंदगतीने घट होऊ लागली आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच होती.
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सांगली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ नोंदली गेली. गेल्या तीन दिवसांपासून धरण व नदी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नदीकाठी निर्माण झालेली पुराची धास्ती आता दूर झाली आहे.
येत्या सहा दिवसांत जिल्ह्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आठवडाभर कृष्णा व वारणा नदीपातळीत मोठी घट होण्याची शक्यता आहे.
धरणातून विसर्ग सुरू
कोयना धरणातून सध्या २,१०० क्युसेक तर वारणा धरणातून १,८३८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपातळीत येत्या दोन दिवसांत मोठी घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.
कोयना धरण क्षेत्रात जोर ओसरला
कोयना धरण क्षेत्रात रविवारी सायंकाळी ५ वाजता १८ मिमी, तर वारणा क्षेत्रात ९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. शनिवारच्या तुलनेत या ठिकाणच्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी (रविवारी सायं. ५ वा.पर्यंत)
बहे ८
ताकारी २०.५
भिलवडी २०.५
आयर्विन १९
अंकली २४.९
म्हैसाळ ३४.७
सांगली जिल्ह्यातील पाऊस मिमी (रविवारी स. ८ पर्यंत)
मिरज ६
जत १
खानापूर-विटा ४.३
वाळवा-इस्लामपूर ९.२
तासगाव ५.५
शिराळा १५.४
आटपाडी २.५
कवठेमहांकाळ ४.२
पलूस ७.२
कडेगाव ५