‘म्हैसाळ’च्या आवर्तनाचे आदेशच नाहीत!--- लोकमत विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:34 AM2018-03-13T00:34:29+5:302018-03-13T00:34:29+5:30
सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार
सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी असे कोणतेही आदेश अजून तरी कोणीही दिले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतकरी व विरोधी पक्षांचा वाढता असंतोष पाहता, पाणी सोडण्यासाठी खा. संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गेल्या महिनाभरापासून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. वाढती थकबाकी व थकबाकी वसुलीस शेतकऱ्यांकडून अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने आवर्तनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. एकीकडे पाणी लांबत असतानाच लाभक्षेत्रातील शेतीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांनी शासनदरबारी विशेष प्रयत्न करून योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत तरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडे पाणी सोडण्याबाबतचे कोणतेही आदेश नव्हते.
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच कॉँग्रेस, राष्टÑवादीसह इतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाणी सोडण्यासाठी मिरजेत मोर्चा काढला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळेच भाजप नेत्यांची धावपळ सुरू होती.दुसरीकडे जिल्ह्यातील टेंभू व ताकारी योजनेप्रमाणे थकबाकी वसुलीस प्रतिसाद देत पाणी मिळावे यासाठी शेतकºयांकडूनही कोणतेही पाऊल टाकले जात नसल्याचे चित्र आहे.
तिन्ही योजनांसाठी : पन्नास कोटींचा निधी
म्हैसाळ योजना तातडीने सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ५० कोटी रुपये मंजूर केले असून त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सहीदेखील झाल्याची माहिती खा. संजयकाका पाटील यांनी सोमवारी रात्री दिली. मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील म्हैसाळ (२९.६६ कोटी), टेंभू (१७.५ कोटी) आणि ताकारी (३ कोटी) या तिन्ही योजनांची थकबाकी या निधीतून भरली जाणार आहे. विशेषत: थकबाकीमुळे सध्या बंद असलेल्या ‘म्हैसाळ’ची थकबाकी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून तातडीने भरली जाणार असून पाणी सुरू करण्यात येणार आहे.
धडपडीला यश नाही
रविवार दि. ११ रोजी मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा दौºयावर येणार होते व त्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा होणार होता. या मेळाव्याच्या अगोदर पाणी सुटावे, यासाठी खा. पाटील प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही घेतली होती. मात्र, अद्याप यास यश आले नसल्याचे चित्र आहे.
तीस कोटींवर थकबाकी
म्हैसाळ योजनेची एकूण ३४ कोटी ५० लाखांची थकबाकी असून यातील साडेपाच कोटी शासनाने भरले आहेत. त्यामुळे आता थकबाकी २९ कोटींवर आहे. प्रशासनातर्फे विविध मार्गाने वसुलीसाठी प्रयत्न केले जात असले तरी त्यास प्रतिसाद मिळत नाही.
म्हैसाळ योजनेच्या थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत नाही. पाणी सोडण्याबाबतही शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
- सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता