सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होवू नका, घाबरू नका, खबरदारी घ्या, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील कोरोना रूग्णांकरिता उभारण्यात आलेल्या कक्षाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे आदि उपस्थित होते.जिल्ह्यात औषधांचा व एन-95 मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. एन-95 हा मास्क आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठीच आहे. सर्वसामान्य नागरिकांनी याचा विनाकारण वापर करू नये. शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल धरावा असे सांगून, डॉ. म्हैसेकर म्हणाले, परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाच्या दृष्टीकोनातून विशिष्ट तपासण्या केल्या जात आहेत.
संशयितांना आपल्या राज्याच्या मुंबईच्या विमानतळावरच विलगीकरण कक्षामध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा प्रवाशांना संबंधित जिल्ह्यामध्ये पाठविले जाते व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांच्या दैनंदिन सर्वेक्षणाखाली 14 दिवस ठेवले जाते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोना बाधित कोणताही रूग्ण परस्पर दाखल होवू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणाने घाबरू नये व अफवा पसरवू नये तसेच पसरविलेल्या अफवांवर विश्वासही ठेवू नये, असे आवाहन करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोरोनावर खबरदारी हाच महत्वाचा व आवश्यक असा प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मेळावे, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी जाणे टाळावे.
लक्षण आधारित रूग्ण निर्दशनास आल्यास शासकीय व खाजगी रूग्णांलयामध्येही उपचाराची तयारी ठेवावी. त्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. औषधे व मास्क यांची चढ्या दराने विक्री होणार नाही, अनावश्यक साठा होणार नाही याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने आवश्यक दक्षता घ्यावी. नागरिकांनी हेल्दी लाईफ स्टाईल ठेवावी, संतुलित आहार घ्यावा, अनावश्यक मास्क वापरू नये. हात स्वच्छ धुवावेत, वारंवार डोळे, चेहरा यांना हात लावणे टाळावे, हॉटेल्समध्ये परदेशी व्यक्ती वास्तव्यास असल्यास व अशी व्यक्ती आजारी पडल्यास त्याबाबत वैद्यकीय यंत्रणेला त्वरीत कळवावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.