लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी मंगळवारी (दि. २३) सायंकाळी विटा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यांनतर अवघ्या काही तासांतच चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खानापूर रस्त्यावरील दोन दुकाने फोडली. कार्यभार हातात घेताच चोरट्यांनी नव्या साहेबांना ‘सलामी’ दिल्याने नागरिकांत भययुक्त चर्चेला सुरुवात झाली आहे.
खानापूर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून गुरुकृपा मोटार रिवाइंडिंगचे दुकान फोडून दुकानातील तांब्यांची तार व अन्य साहित्य लंपास केले. त्यानंतर शेजारी असलेल्या एका नाष्टा सेंटरमध्येही चोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, या दोन ठिकाणी चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील समजू शकला नाही. या घटनेची विटा पोलिसांत नोंद नाही.
दरम्यान, विटा पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेताच चोरट्यांनी दोन दुकाने फोडून नव्या साहेबांना ‘सलामी’ दिली आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात चोरीचे वारंवार प्रकार घडत आहेत. खासगी सावकारी, अवैध धंदे, शहरातील कोलमडलेली वाहतूक व्यवस्था यांसह कायदा, सुव्यवस्था, आदी विविध प्रश्न नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. त्यामुळे विटा पोलीस ठाण्याचा नव्याने कार्यभार हाती घेतलेले पोलीस निरीक्षक संतोष डोके याबाबत काय भूमिका घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.