सांगली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्हा राज्यात तृतीय क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगली जिल्ह्याने 80.8 गुणांकण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ स्वाती देशमुख यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शी वातावरणात पार पडली आहे. या निवडणूकीसाठी राजयातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेवून या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.मुख्य निवडणुक अधिकारीस्तरावर सर्व जिल्ह्यांचे गुणांकन करण्यात आले आहे. यामधून पुणे विभाग सर्वोत्कृष्ट ठरला असून संबंधित गुणांकनातून सर्व जिल्ह्यातून सर्वाधिक गुण मिळालेले तीन जिल्हे व प्रत्येक जिल्ह्यातून एक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.सर्व जिल्ह्यातून सर्वाधिक गुण मिळालेले तीन जिल्हे पुढीलप्रमाणे गडचिरोली - 85.4, कोल्हापूर 82.4, सांगली व औरंगाबाद प्रत्येकी 80.8 असे आहे. विभागानिहाय सर्वोत्कृष्ट ठरलेले जिल्हे पुणे विभाग - कोल्हापूर जिल्हा (82.4), नागपूर विभाग - गडचिरोली जिल्हा (85.4), औरंगाबाद विभाग - औरंगाबाद जिल्हा (80.8), कोकाण विभाग - रायगड जिल्हा (79.3), अमरावती विभाग - अकोला जिल्हा (76.2) नाशिक विभाग - नंदूरबार जिल्हा (73.7) असा आहे.