सांगलीत तेरा वाहने फोडली, एक चारचाकी जाळली ; नशाबाज तरुणांचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:21 PM2020-01-01T19:21:07+5:302020-01-01T19:22:19+5:30
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील १३ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर एक मोटार पेटवून देण्यात आल्याने खाक झाली. नशेबाज तरुणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार या भागातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सांगली : मंगळवारी रात्री सर्वजण नववर्षाच्या स्वागतास सज्ज असताना व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरभर पोलीस बंदोबस्त तैनात असताना, शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील १३ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर एक मोटार पेटवून देण्यात आल्याने खाक झाली. नशेबाज तरुणांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार या भागातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
शहरातील शंभरफुटी रस्त्यावर वाहनांच्या गॅरेजची संख्या मोठी आहे. मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास तरुणांच्या टोळक्याने नशेत वाहनांच्या तोडफोडीस सुरूवात केली. यातील काही वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली होती, तर काही वाहने दुरुस्तीच्या निमित्ताने गॅरेजसमोर उभी होती. वाहनांची तोडफोड करताना मोटार (क्र. एमएम ०४ सीएम ३४८६) पेटवून देण्यात आल्याने ती जळून खाक झाली.
मनसेचे उपसचिव अशिष कोरी कुटुंबासह कोल्हापूरहून रात्री सांगलीत येत असताना, त्यांना शंभरफुटी रस्त्यावर आग लागल्याचे दिसले. त्यांची मोटार आगीच्या दिशेने पुढे गेल्यानंतर काही तरुण त्यांच्या मोटारीच्या दिशेने येत असल्याचे दिसले. ते तरुण धिंगाणा घालत होते. त्यामुळे त्यांनी मोटार थांबवली नाही. त्यावेळी त्यांच्या मोटारीवरही दगड मारण्यात आले. पुढे जाऊन कोरी यांनी पाहिले, तर एक मोटार जळत होती. तसेच काही वाहने फोडलेली दिसल्याने, घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टोळक्याला शोधण्यासाठी मोहीम उघडली. त्यात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बुधवारी दिवसभर आणखी काही तरुणांना ताब्यात घेत चौकशी सुरू ठेवली होती. नशेच्या अमलाखाली तरुणांनी तोडफोड करीत मोटार पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.