मिरज : कोरोना प्रतिबंधासाठी सलग दुसऱ्या वर्षी लाॅकडाऊनमुळे मिरज तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रातील फुलांचे पिक वाया जात आहे. मिरजेतील फुलांच्या बाजारात दररोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुलांची विक्री बंद असल्याने फुले तोडून शेतातच टाकून देण्याची वेळ आली आहेत.
गतवर्षीचे लाॅकडाऊनमधून सावरल्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या झेंडू, गुलाब, निशिगंध, गलाटा, लिली या फुलांचे पिक लग्नाच्या हंगामासाठी तयार झाली आहेत. एप्रिल महिन्यात पुन्हा लाॅकडाऊन सुरु झाल्याने फुले शेतातच वाळत आहेत. मे महिन्यात फुलांचा व्यापार सुरु होईल या अपेक्षेने पीक जगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाॅकडाऊन वाढल्याने नांगरून पिके काढून टाकण्याची वेळ आली आहे. फुलांचे नियमित उत्पादन घेण्यासाठी नियमित तोडणी करावी लागते. मात्र तोडणी खर्च परवडणारा नसल्याने हजारो एकरातील पिके सोडून देण्यात आली आहेत. यापैकी गुलाब व हरितगृहातील जरबेरा कार्नेशिया ही फुले वगळता झेंडू, गुलाब, लिलि, गलांडा, निशिगंध या फुलांची पुन्हा लागवड करावी लागणार आहे. मिरज तालुक्यात सुमारे दोन हजार एकर झेंडू, हजार एकर निशिगंध, गलांडा, पाच हजार एकर गुलाबाचे क्षेत्र आहे. मिरजेतील फुलांच्या बाजारातून दररोज मुंबई कोकणसह कर्नाटकात फुलांची निर्यात होते. स्थानिक बाजाराच्या तुलनेत मोठ्या शहरात मागणी व दर जास्त असल्याने वर्षभर फुलांची निर्यात सुरु असते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी लग्नाच्या हंगामातच फूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जिल्ह्यात हरितगृहात डच गुलाब, जरबेरा, कार्नेशिया या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. फुलांच्या निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न बंद झाले मात्र झाडे जगविण्यासाठी धडपड सुरु आहे. गुलाबाची व हरितगृहातील फुलांची झाडे जगविण्यासाठी नियमित तोडणी करावी लागते. मात्र इतर फुलांची पुन्हा लागवड करण्यासाठी एकरी ४० ते ६० हजार खर्च करावा लागणार आहे. बाजारपेठा बंद झाल्याने फुले टाकून देण्याची, पिकात जनावरे सोडण्याची व नांगरून पीक काढून टाकण्याची वेळ आल्याने फुले उत्पादक हवालदिल आहेत. लाॅकडाऊन कधी संपणार हे अनिश्चित असल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी असल्याचे फुलांचे व्यापारी पंडित कोरे यांनी सांगितले.