राज्यात सरकारने सोमवारपासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर केले आहेत. यामध्ये देशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत परंतु करोली टी येथे मंगळवारी देशी दारूचे दुकान मागील बाजुने उघडून मद्यविक्री सुरू असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली.
त्यानुसार कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी करे, अक्षयकुमार ठिकणे, हवालदार सुभाष पडळकर, दादासाहेब ठोंबरे, प्रशांत जाधव, आलम फकीर, विठ्ठल सानप, पोपट देसाई यांच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी मागील दाराने देशी दारूची विक्री सुरू असल्याचे दिसले. या छाप्यात ११० देशी दारूचे बॉक्स मिळाले. या दारूची किंमत दोन लाख त्र्यऐंशी हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी सतीश चंदनशिवे, धनाजी ओलेकर यांना अटक करण्यात आली.