इस्लामपुरातील चौक सुशोभिकरणाचे तीन-तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:38+5:302021-07-02T04:18:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेकडून राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहरातील मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आणि काही रस्त्यांवर पदपथही ...

Three-thirteen of the square beautification in Islampur | इस्लामपुरातील चौक सुशोभिकरणाचे तीन-तेरा

इस्लामपुरातील चौक सुशोभिकरणाचे तीन-तेरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेकडून राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहरातील मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आणि काही रस्त्यांवर पदपथही तयार केले होते. परंतु, सध्या नियोजनाअभावी चौक सुशोभिकरणाचे तीन-तेरा वाजले आहेत. रस्ते दुभाजकांची मोडतोड झाली आहे. शहरातील पदपथांवर फलकांचे अतिक्रमण झाल्याने ते गायब झाले आहेत.

सांगलीहून इस्लामपुरात प्रवेश करताना आंबेडकर चौकानजीक खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रस्ते दुभाजक किंवा सिग्नलचा पत्ता नाही. याच परिसरातील विजय कृषी उद्यानामधील शेतकरी, बैल, बैलगाडी आदी पुतळ्यांचा डागडुजीविना रंग उडाला आहे. आष्टा नाका परिसरातील चौकात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. तेथून पुढे पोस्ट कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. पोस्ट कार्यालय आणि शनी मंदिरनजीक चौकाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. शिवाजी पुतळा चौकात नवीन उभारलेल्या प्रशासकीय इमारतीसमोरच घाणीचे साम्राज्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झेंड्यासाठी तयार केलेल्या कट्ट्याची पडझड झाली आहे. नाट्यगृहावरील नावासमोरील भिंतीचे सिमेंट निघून पडले आहे, तर या चौकातील हुतात्मांच्या नावाच्या फलकाचीही दुर्दशा झाली आहे.

तहसील कार्यालय ते यल्लाम्मा चौक दरम्यान बसवलेल्या लोखंडी रस्तेदुभाजकाची मोडतोड झाली आहे. यल्लम्मा चौकात सुशोभिकरण झालेले नाही. गांधी चौकात मध्यभागी बसवलेली वाहतूक पोलिसांची बैठक व्यवस्था गायब झाली असून, या चौकातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. जुनी भाजी मंडई येथे रस्ता अरूंद आहे. याच परिसरातील बोटिंग क्लबचे काम अर्ध्यावरच सोडून दिले आहे.

चाैकट

चबुतऱ्याची दुरवस्था

अबुल कलाम आझाद चौक या नावाने बसस्थानक रस्त्यावर चबुतरा बांधण्यात आला होता. हा चबुतरा आता दिसत नसून, विजेच्या खांबावरच्या पेट्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे.

Web Title: Three-thirteen of the square beautification in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.