मिरज शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील एकमेव शासकीय कोविड प्रयोगशाळा असून येथे संशयित कोरोना रुग्णांच्या स्रावांच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील रुग्णांची व संशयितांची दररोज हजार नमुन्यांची तपासणी सुरू होती. या प्रयोगशाळेत वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख नमुने तपासण्यात आले आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यापासून दररोज नमुन्यांच्या संख्येत मोठी वाढ असून एप्रिल महिन्यात सुमारे ५० हजार नमुन्यांची तपासणी झाली आहे. कोविड प्रयोगशाळेत काम वाढत असल्याने पॅथाॅलाॅजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी व जिल्हा परिषदेकडील आरोग्य साहाय्यकांचीही मदत घेण्यात येत आहे.
गतवर्षी डिसेंबरपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने प्रयोगशाळेवरील ताण कमी झाला होता. जानेवारीपर्यंत दररोज दोनशे नमुने तपासणीसाठी येत होते. मात्र मार्चअखेर नमुन्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन एप्रिलमध्ये ही संख्या दररोज अडीच हजारांच्या पुढे गेली. आता मे महिन्यात आता दररोज तीन हजार नमुने तपासणीसाठी येत आहेत. दैनंदिन तपासणी संख्या वाढत असल्याने प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना मदतीला रुग्णालयाच्या अन्य विभागातील तंत्रज्ञ व कंत्राटी कर्मचारी मदत करीत आहेत. प्रयोगशाळेत २४ तास काम सुरू असून तपासणीसाठी मर्यादित उपकरणे असल्याने तपासणीची गती संथ असून अहवाल दोन दिवसांनी मिळत आहे. गतवर्षी तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांत पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दहा टक्के होते. मात्र एप्रिलपासून सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण तब्बल चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.
चाैकट
सध्या येणाऱ्या नमुन्यांत पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण तब्बल चाळीस टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास त्याची दोन वेळा तपासणी करावी लागत असल्यानेही प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.