विटा पालिकेतील हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:02+5:302021-06-19T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या हुकूमशाही व दडपशाहीला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा सत्ताधारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या हुकूमशाही व दडपशाहीला कंटाळून नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुतणे व नगरसेवक पद्मसिंह सुभाष पाटील यांनी केला. यापुढे कोणत्याही राजकीय परिणामांची तमा न बाळगता काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पद्मसिंह पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्याबाबत शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषदेत राजीनाम्याबाबतचा खुलासा केला.
पाटील म्हणाले की, मी २०१६ ला प्रभाग ११ मधून नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे नगरसेवक झालो; मात्र या प्रभागातील विकास कामांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जी काही कामे झाली, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. काँक्रीटचे रस्ते वर्षभरात वाहून गेले. अन्य प्रश्नही मार्गी लागले नाहीत.
सत्ताधारी गटाने स्वच्छता कर, पाणीपट्टी, घरपट्टी करात भरमसाट वाढ केली. जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांपेक्षा विटा पालिकेची करवाढ मोठी आहे. त्यामुळे कराच्या रकमेचा निकृष्ट विकासकामे व मलई खाण्यासाठी वापर करण्यापेक्षा अपंग, दिव्यांगांना भत्ता सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. दस्तखताच्या एक टक्का कर लावून लुबाडणूक सुरू केली.
त्याबाबत लोक काही बोलू शकत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही व दडपशाही याला कारणीभूत आहे. जनता प्रचंड दहशतीखाली आहे.
मनमानी, दडपशाही व हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिला असला तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रोखठोक भूमिका घेणार आहे. मला राजकीय परिणामांची भीती नाही. लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणार असल्याचे पद्मसिंह पाटील यांनी सांगितले.
चौकट
सत्ताधाऱ्यांची जनसेवा हीच का?
शहरातील दलित मित्राला मी मित्रांच्या मदतीतून खाद्यपदार्थाचा स्टॉल लावून दिला होता. त्याचा प्रारंभ माझ्या हस्ते झाला म्हणून काही मंडळींनी तो स्टॉल एका रात्रीत जेसीबीने उचलून क्रीडा संकुलात टाकला व तेथे त्या हातगाडीची तोडफोड केली. हा सत्ताधाऱ्यांचा प्रकार लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या विचारांना, राजकारणाला व जनसेवेला शोभणारा नाही, असेही पद्मसिंह पाटील म्हणाले.