फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतीक पाटील, आनंदराव नलावडे, विशाल चौगुले, कुमार लोंढे, भरत देशमुख आदी.
लोकमत न्युज नेटवर्क
कसबे डिग्रज : कसबे डिग्रजमध्ये सध्या महत्त्वपूर्ण विकासकामे होत आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवक नेते प्रतीक पाटील यांनी दिली.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते आनंदराव नलावडे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, भरत देशमुख, कुमार लोंढे, संग्राम पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले की, कसबे डिग्रजची विकसनशील गाव म्हणून ओळख आहे. या गावासाठी महत्त्वपूर्ण असणारे अंतर्गत पाइपलाइनचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली मागणी पुर्ण होत आहे. स्मशानभूमीचे नूतनीकरण केले जाणार आहे.
प्रतीक पाटील यांच्या हस्ते कसबे डिग्रज ते समडोळी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी उपसरपंच सागर चव्हाण, प्रमोद चव्हाण, अशोकराव चव्हाण, संदीप निकम, अजय चव्हाण आदी उपस्थित होते.