संतोष भिसेसांगली : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचेही आदेश आहेत. यामुळे कोरोना कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे.वैद्यकीय शिक्षण व अौषधी द्रव्य विभागाने सोमवारी संध्याकाळी बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्यांत अनेक वरिष्ठ व कोविड उपचारांमध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. त्याशिवाय पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील नऊ व सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती महाविद्यालयातील दोघा डॉक्टरांनाही साताऱ्याला पाठविले आहे.
मिरजेतील बदल्या झालेले सर्वच डॉक्टर कोविडमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. काहीजण मिरजेत तर उर्वरीत सांगली शासकीय रुग्णालयात काम करताहेत. सर्वजण सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत. सातारा वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. अधिष्ठात्यांनी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी आदेशात म्हंटले आहे.साताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालयसाताऱ्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु होतील. त्यासाठी विविध ५१० पदे भरली जाणार आहेत. महाविद्यालयाला मंजुरीसाठी एनएमसी (नॅशनल मेडिकल कौन्सिल) तर्फे लवकरच पाहणी होणार आहे. तोपर्यंत तात्काळ पदे भरणे शक्य नसल्याने मिरज, पुणे व सोलापुरातून डॉक्टरांना पाठविले आहे.एनएमसीच्या नियमानुसार एखादा डॉक्टर पाहणीवेळी महाविद्यालयात नियुक्ती दाखविल्यास पुढील वर्षभरापर्यंत त्याला अन्य महाविद्यालयात हजर होता येणार नाही. त्यामुळे मिरजेतून ३७ डॉक्टर्स साताऱ्याला हजर झाल्यास वर्षभरासाठी ते कागदोपत्री तेथेच राहतील. सातारा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गायकवाड मंगळवारी मिरजेत आले, आदेशानुसार डॉक्टरांना त्वरीत कार्यमुक्त करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. तथापि, सध्यातरी ते मिरज व सांगली रुग्णालयातच काम करणार आहेत.मुंबई, कोल्हापुरातूनही बदल्याअलीबाग येथील नव्या महाविद्यालयासाठी मुंबईतून तर सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयासाठी कोल्हापुरातून डॉक्टर घेतले आहेत. अलीबागसाठी मुंबईतून ४१, पुण्यातून २ व नागपुरातून एक असे ४४ डॉक्टर घेतले आहेत. सिंधुदुर्गसाठी कोल्हापुरातून ३३, मिरजेतून सहा, लातुरातून एक व नांदेडमधून दोन असे ४४ डॉक्टर्स घेतले आहेत.