कोरोनाग्रस्तांना आपुलकीची वागणूक द्या : मनोज सुतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:29+5:302021-04-27T04:27:29+5:30
गोटखिंडी : गोटखिंडीत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. काही रुग्ण रुग्णालयात आहेत तर काही घरीच विलगीकरणामध्ये आहेत. काही कुटुंबातील ...
गोटखिंडी : गोटखिंडीत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. काही रुग्ण रुग्णालयात आहेत तर काही घरीच विलगीकरणामध्ये आहेत. काही कुटुंबातील कोरोनाबाधित आले असतील त्यांना काही हवे असेल, त्यांना मदतीचा हात देत आपुलकीची वागणूक द्यावी. जेणेकरून ते व कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर येणार नाहीत, असे आष्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार यांनी बैठकीत सांगितले.
गोटखिंडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विजय लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य व आष्टा पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी अधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी कोरोना संसर्ग गावात वाढणार नाही याबाबत दक्ष राहून कामकाज केले पाहिजे.
गावातून चौकातून, बिनकामाचे फिरणारे, वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणे, कोरोनाबाधित असणाऱ्या कुटुंबातील लोकांनी घराबाहेर न फिरणे याबाबत लक्ष ठेवून, तसे नियमाचे कोणी उल्लंघन करीत असल्यास आम्हास कळवावे किंवा आपणाकडूनही दंडात्मक कारवाई करावी.
यावेळी उपसरपंच विजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षाराणी मोहिते, धैर्यशील थोरात, अविनाश डवंग, नंदकुमार पाटील, राहुल भाेईटे, विलास खराडे, विनायक पाटील, प्रकाश एटम, लालासाहेब थोरात, अशोक कुलकर्णी, संजय माने, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, पोलीस हवलदार अशोक जाधव, उदय पाटील उपस्थित होते.