कारंदवाडी येथील तुषार कणसे यांची अवयव दान मोहीम समाजासाठी ठरतेय प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:40 AM2017-12-13T00:40:26+5:302017-12-13T00:40:32+5:30
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे.
आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे. आजअखेर सुमारे ४० अवयव दात्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात ते यशस्वी ठरले असून, या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केल्यास भविष्यात अनेक रुग्णांचा जीव वाचणार आहे.
कारंदवाडी हे आष्टा-सांगली रस्त्यावरील एक छोटे खेडेगाव. वडील राजाराम कणसे या सुसंस्कृत शिक्षकाच्या संस्कारांमुळे लहानपणापासून डॉ. कणसे गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर मोठ्या शहरात व्यवसाय न करता गावातील रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आष्टा, कारंदवाडी, तुंग येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेकदा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्यांना राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे राज्य सरचिटणीस पद मिळाले. आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे घेतली. या शिबिरातूनच त्यांना अवयवदान विषयावर काम करण्याची प्रेरणा मिळाली. एखाद्या रुग्णाचे अवयव निकामी झाल्यास त्याला दुसरा अवयवदाता मिळाला, तरच त्याचे जीवन सुसह्य होते अन्यथा मृत्यू अटळ ठरतो.
वेळेत अवयव दाते उपलब्ध न झाल्याने आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबद्दल समाजात जनजागृती करून लोकांना अवयव दानासाठी प्रेरित करण्याची मोहीम कणसे यांनी हाती घेतली. वाळवा, तासगाव, शिराळा, मिरज यासह जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. प्रारंभी लोकांना पटले नाही, मात्र त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. हळूहळू लोकांना आपल्या अवयवांची मृत्यूनंतर राख होण्यापेक्षा, त्यांची कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल, ही जाणीव होत आहे. यातूनच आजअखेर सुमारे चाळीस अवयव दात्यांनी उपक्रमास प्रतिसाद दिला.
शरद पवारांकडून कौतुक
हजारो अवयवदाते तयार झाले, तर अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतील, असा विश्वास डॉ. कणसे यांनी व्यक्त केला. डॉ. कणसे यांच्या कार्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही कौतुक केले. त्यांचा हा समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत ठरला आहे.