खानापूर : खानापूर परिसरात शनिवारी रात्री दोन एसटी बसेसवर दगडफेक झाली. यामध्ये १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात खानापूर पोलिसांनी गणेश जगन्नाथ कदम (रा. भडकेवाडी, ता. खानापूर) व पवन गणपतराव भवर (रा. विजयनगर, ता. तासगाव) या संशयितांना अटक केली आहे. शिराळा तालुक्यातील सोनवडेतही बसवर दगडफेक झाली.
विटा आगाराची कोल्हापूर-खानापूर (क्र. एमएच २०, बीएल ११४१) ही बस खानापूरला येत होती. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास खानापूर जवळील भडकेवाडी घाटात बस आली होती. त्यावेळी बसच्या मागील बाजूने दगडफेक झाल्याने प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. चालक आनंदराव खोडके (रा. शेडगेवाडी, ता. खानापूर) यांनी बस थांबवून पाहणी केली. यावेळी गणेश कदम व पवन भवर हे दोघे दुचाकीवरून (क्र. एमएच १४, जीबी ९९५०) दगडफेक करत असल्याचे आढळले.
बसच्या चालक व वाहकांनी प्रवाशांच्या मदतीने दोघांना पकडून खानापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, खानापूर-विटा रस्त्यावर पेट्रोलपंपासमोर खानापूरकडे येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसवरही (क्र. एमएच ४०, एन ८५९४ ) समोरील काचेवर दगडफेक झाल्याने चालक, वाहक पोलीस औट पोस्टमध्ये आले होते. त्यांनी तेथे असणाऱ्या कदम व भवर या दोघांनाही ओळखले. या दगडफेकीत एसटीचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी हुबाले करीत आहेत.
सोनवडे येथे बसवर दगडफेक
शिराळा आगाराची शिराळा-मणदूर ही बस (एमएच ४०, एक्यू ६३०१) रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मणदूरहून शिराळाकडे निघाली होती. सोनवडे येथील हुतात्मानगर विद्यालयाच्या स्टॉपवर बस आली असता वारणा नदीच्या बाजूने काळे मास्क लावून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी समोरील काचेवर दगड मारले. चालक राहुल माळी यांनी गाडी थांबवताच दुसऱ्याने मागील बाजूस जाऊन डाव्या बाजूच्या काचेवर दगड मारत उसातून पळ काढला.यामध्ये बसचे अंदाजे १४ हजार ८७९ रुपयांचे नुकसान झाले. यावेळी बसमध्ये सहा प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच कोकरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस नाईक शिवाजी जाधव, चंद्रकांत माने, काॅन्स्टेबल शंकर गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. चालक राहुल माळी यांनी पोलिसात फिर्याद दिली.