शिराळ्यात भाजपचे दोन गट पुन्हा आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:09+5:302021-05-15T04:25:09+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील भाजपमध्ये तीन गट कार्यरत असून, शिवाजीराव नाईक-सत्यजित देशमुख गट एकत्र ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील भाजपमध्ये तीन गट कार्यरत असून, शिवाजीराव नाईक-सत्यजित देशमुख गट एकत्र आहेत, तर सम्राट महाडिक गटाचा सवतासुभा आहे. ही गटबाजी वारंवार दिसली आहे. आता पुन्हा भाजप युवामोर्चाच्या निवडीतून हे दोन गट समोरासमोर आले आहेत. दोन्ही गटांकडून सारवासारव सुरू आहे. हा वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत गेल्याने ही निवड थांबल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत शिराळ्यातून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपची उमेदवारी मिळाली होती. त्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांची साथ मिळाली. मात्र, त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक यांनीही स्वत:ची उमेदवारी ठेवली. शिवाजीराव नाईक व सम्राट महाडिक दोघेही पराभूत झाले. त्यानंतर महाडिक यांनी तालुक्यातील भाजपच्या जुन्या गटाशी हातमिळवणी केली. दूध आंदोलनावेळी दोन्ही गटांची वेगवेगळी भूमिका व आंदोलने दिसून आली. काही दिवसांनी पार पडलेल्या पक्षाच्या निवडींमध्ये नाईक यांची वर्णी लागली होती, त्यावेळी महाडिक त्यांच्या घरी सत्कारासाठी गेले होते.
आता भाजप युवा मोर्चाच्या निवडीत महाडिक गटास बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. महाडिक गटाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे तक्रार केली. परिणामी निवड स्थगित झाल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे शिवाजीराव नाईक तालुकाध्यक्षांबरोबर व त्यांच्या सूचनेनुसार काम करीत आहेत, असे सांगितले जाते, तर महाडिक गट मात्र आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचे सांगत आहे.
काेट
युवामोर्चाच्या कोणत्याही निवडी झालेल्या नाहीत. कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकल्या आहेत. या निवडी अधिकृत नाहीत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा आदेश येईल, तेव्हा पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन याबाबत निर्णय होईल.
- सुखदेव पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष, भाजप
काेट
निवडी जाहीर झाल्याचे आम्हाला सोशल मीडियावरून समजले. आमच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना याबाबत कळविले आहे.
- सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य.