बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना अटक; शहर पोलीस : कल्याणमधून ताब्यात, एक फरारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:31 PM2018-08-29T21:31:06+5:302018-08-29T21:32:21+5:30

सांगलीत दोन हजाराच्या बनावट नोटा खपविणाऱ्या राज राजकुमार उज्जेनवाल सिंह याच्या दोन साथीदारांना शहर पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. प्रेमविष्णू रोगा राफा (वय २६, रा. काटेमानेवली, कल्याण) व नरेंद्र आशापाल

 Two more arrested in fake currency; City Police: A prisoner from Kalyan, one runaway | बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना अटक; शहर पोलीस : कल्याणमधून ताब्यात, एक फरारीच

बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघांना अटक; शहर पोलीस : कल्याणमधून ताब्यात, एक फरारीच

Next

सांगली : सांगलीत दोन हजाराच्या बनावट नोटा खपविणाऱ्या राज राजकुमार उज्जेनवाल सिंह याच्या दोन साथीदारांना शहर पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे. प्रेमविष्णू रोगा राफा (वय २६, रा. काटेमानेवली, कल्याण) व नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, रा. आनंदवाडी, कल्याण) अशी या दोघांची नावे आहेत. यातील राफा याच्याकडून दोन हजाराच्या २९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती शहरचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे. या प्रकरणातील आणखी एक तिसरा साथीदार अद्याप फरार आहे.

सांगलीत बनावट नोटा खपविण्यासाठी हे चौघेजण आले होते. २३ आॅगस्ट रोजी बसस्थानकाजवळील एका चिरमुरे दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले. यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला या नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना, ‘नोट बनावट आहे की काय?’ असा प्रश्न उपस्थित केला. यावर त्यांनी, ‘नाही मावशी, नोट खरी आहे’, सांगितले. त्यानंतर ते तेथून एका चौकात जाऊन थांबले. महिलेने हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीस सांगितला.

या व्यक्तीने नोट पाहिली. त्यालाही ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तातडीने दाखल झाले. संबंधित महिलेने पोलिसांना संशयित दाखविले. पोलीस आल्याची चाहूल लागताच या चौघांनीही पलायनाचा प्रयत्न केला. यातील राज सिंह यास पकडण्यात यश आले, तर उर्वरित तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.
मजुरी करणारा राज हा कल्याणमधील शिपूरम आपर्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहत असल्याचे उघडकीस आले. त्याने साथीदार प्रेमविष्णू राफा हा खासगी नोकरी करत असून तो संजय गांधीनगर, पुणे लिंक रोड, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ काटेमानेवली, कल्याण येथे राहतो, तर नरेंद्र आशापाल ठाकूर हा हमाली करत असून तो आंबेडकर कॉलनी, न्यू दुर्गा मंदिर आनंदवाडी, कल्याण पूर्व या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, सुशांत ठोंबरे, बिरोबा नरळे यांचे पथक कल्याणला रवाना झाले होते. या पथकाने राज सिंह याचे साथीदार राफा आणि ठाकूर या दोघांना पकडले आहे. त्यापैकी राफा याच्याकडे दोन हजाराच्या २९ बनावट नोटा व मोबाईल सापडला. या टोळीतील चौथा साथीदार मनीष (पूर्ण नाव नाही) हा अद्याप फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.



प्रकाश पाटीलकडून लिंगनूरच्या तरुणास पाच लाखांचा गंडा
नोकरीचे आमिष : मिरज ग्रामीण पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा
मिरज : सांगलीतील ठकसेन प्रकाश कल्लूशा पाटील याने लिंगनूर (ता. मिरज) येथील कुमार पाटील या तरुणास कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुमार पाटील यांनी मिरजेतील ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

सांगलीतील वसंतनगर येथील ठकसेन प्रकाश पाटील याने नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केली आहे. तीन वर्षांपूर्वी लिंगनूर येथील कुमार पाटील यांचे नातेवाईक चौरंगनाथ सोनुरे यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रकाश पाटील याने कुमार पाटील कुटुंबियांची भेट घेऊन मृत सोनुरे यांचा मित्र असल्याच्या भूलथापा दिल्या. रमेश वाडकर असे नाव सांगून राज्य जनसंपर्क अधिकारी असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर कुमार पाटील यांच्याशी ओळख वाढवली होती.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शिपायाची नोकरी देण्यासाठी कुमार पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन प्रकाश पाटील गायब झाला. त्याने दिलेल्या सांगलीतील संजयनगर येथील पत्त्यावर चौकशी केली असता तेथे रमेश वाडकर कोणी राहत नसल्याचे निष्पन्न झाले.

आता इचलकरंजीच्या पोलिसांनी हातकणंगले येथील महिलेच्या फसवणूक प्रकरणात प्रकाश पाटील याला अटक केली असून, फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर पाटील याचे वृत्तपत्रात छायाचित्र पाहिल्यानंतर कुमार पाटील यांना रमेश वाडकर या नावाने प्रकाश पाटील याने पाच लाखांचा गंडा घातल्याचे लक्षात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात प्रकाश पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Two more arrested in fake currency; City Police: A prisoner from Kalyan, one runaway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.