सांगली : शहरातील सदासुख टॉकीजजवळून अज्ञाताने १२ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी अनिकेत अशोक बेलवलकर (रा. गावभाग, सांगली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सदासुख टॉकीजच्या बोळात दुचाकी लावण्यात आली होती.
----------
सिव्हिल चौकात पुन्हा वाहतूक कोंडी
सांगली : शहरातील प्रमुख वर्दळीचा असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल चौकात पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता अगोदरच लहान असताना, आता अनेक विक्रेतेही रस्त्यावर आल्याने ही गर्दी वाढली आहे. बुधवारी दुपारी चारही बाजूंना वाहनांची मोठी गर्दी कायम होती. वाहतूक पोलिसांनी प्रयत्न करूनही कोंडी कायम होती.
-------
पोलीस पाल्यांसाठी ई-लायब्ररी
सांगली : पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार आता अभ्यासासाठी लागणारी आवश्यक पुस्तकेही उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा तरुणांना उपयोग होत असून, आता मार्गदर्शन शिबिर घेण्याचेही प्रशासनाचे नियोजन आहे.
-----
जिल्ह्यात अवैध दारूविक्रीवर कारवाई
सांगली : बेकायदेशीरपणे दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. जिल्ह्यातील भिलवडी, पलूस आणि विटा पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई करत दारूच्या १०८ बाटल्या जप्त केल्या. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.