सांगली : जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छतेचे धडे जिल्ह्यातील जनतेला देत असतानाच, मुख्य इमारतीमधील स्वच्छता आणि परिसरातील खड्डे मुजविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातून जिल्हा परिषदेत विकास कामांसाठी येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीतील अधिकारी, पदाधिकारी यांची कार्यालये टकाटक आहेत. कार्यालयातील फर्निचरवर लाखो रुपये खर्च केले आहेत. मुख्य इमारतीतून बाहेर पडल्यानंतर परिसरात अस्वच्छता आणि खड्डे पाहण्यास मिळत आहेत. याकडेही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठे हाल होणार आहेत. खड्ड्यात पाणी साचून एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच जिल्हा परिषद परिसरातील खड्डे त्वरित मुजवावेत.