बावची फाट्यावर अज्ञातांकडून हॉटेलसह उसाच्या फडास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:11+5:302021-01-04T04:23:11+5:30
गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरील बावची फाट्याच्या पूर्व बाजूस आष्टा व बावची शिवेवरील हॉटेल मैत्री पार्कसह बाजूच्या उसाच्या फडास अज्ञातांनी ...
गोटखिंडी : इस्लामपूर-आष्टा रस्त्यावरील बावची फाट्याच्या पूर्व बाजूस आष्टा व बावची शिवेवरील हॉटेल मैत्री पार्कसह बाजूच्या उसाच्या फडास अज्ञातांनी आग लावली. आगीत हॉटेलचे सुमारे १ लाखाचे तर उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले. रविवारी पहाटे ही घटना घडली.
आगीत हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा संच, टेबल, खुर्च्या व इतर साहित्याचे एक लाखाचे नुकसान झाले. याशिवाय रस्त्याच्या उत्तर बाजूच्या शिवारातील ऊस फडास आग लावल्याने शिवारातील १० एकरांवर उस जळून चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. हॉटेल मैत्री पार्कचे मालक व कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून घरी गेले होते. रविवारी पहाटे परिसरातील शेतकऱ्यांच्या हॉटेलमधील साहित्य पेटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हॉटेलमालकास माहिती दिल्यानंतर आगीचा प्रकार लक्षात आला. मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञातांनी हॉटेलचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉटेलमधील दाेन गॅस सिलिंडर गायब केले. हॉटेलमधील शिल्लक चिकन व भातावर ताव मारून अज्ञातांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरा, संगणक, हॉटेलचे साहित्य गॅस गटरच्या सहाय्याने पेटवून दिले. आगीत सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत हॉटेल मालक प्रदीप यशवंत पाटील यांनी आष्टा पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे. हॉटेलच्या पूर्वबाजूस काही अंतरावर असलेल्या चंद्रकांत रकटे यांच्या रसवंतीगृहातील साहित्याची मोडतोड करून नुकसान केले आहे. याशिवाय रस्त्याच्या उत्तर भागातील बावची-आष्टा शिवेवरील शेतातील उसाच्या फडासही आग लावली. या आगीत जगन्नाथ भाेसले यांचा २ एकर, सर्जेराव यादव यांचा २ एकर, भगवान कोळी यांचा दीड एकर, छबूराव कोळी यांचा एक एकर, भूपाल भाेसले यांचा एक एकर, जालिंदर यादव यांचा एक एकर असा १२ एकरांवर ऊस जळाला. रविवारी दुपारपर्यंत या फडातील आग सुरूच होती.
फोटो : ०३ गाेटखिंडी १
ओळ : अज्ञातांकडून आग लावल्याने हॉटेल मैत्री पार्कमधील साहित्य जळून खाक झाले होते.
फाेटाे : ०३ गाेटखिंडी २
ओळ : अज्ञातांकडून आग लावल्याने ऊस फडाचे झालेले नुकसान.