सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:25 PM2018-03-11T23:25:46+5:302018-03-11T23:25:46+5:30
मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.
चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर होत्या.
सबनीस म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. मराठी भाषकांवर सुरू असलेल्या अन्यायाबाबत साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला पाहिजे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत तेथे राष्टÑपती शासन लागू करण्यात यावे.
ते म्हणाले, समाजात रूंदावणारी धर्म व जातीची दरी नष्ट झाली पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. शेतकरी दुर्लक्षित आहेत. कोणीच त्यांना खºयाअर्थाने न्याय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, स्त्रियांच्या लेखनाचा मूळ पाया लोकवाड़मय आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेविरूध्द तिने आवाज उठविला आहे. लोकसाहित्यातून स्त्रीने स्वातंत्र्य मागण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य व स्त्रीसाहित्य असा भेद न करता, समाजाच्या वेदना व समकालीन प्रश्नांना वाचा फोडणाºया लोकसाहित्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. ‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात डॉ. राजेंद्र कुंभार व प्रा. अविनाश सप्रे सहभागी होते. गुरव म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. समोर जळतंय, त्यावर लेखकाचे मत महत्त्वाचे आहे. वादाच्यावेळी कलावंत व लेखक हा सामान्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. कोणाला तरी चांगले वाटण्यासाठी लिहिण्यापेक्षा सत्ताधाºयांशी संघर्ष करणारा सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.
प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, सामाजिक गरजेतून अभिव्यक्ती निर्माण होते. स्वातंत्र्य कशासाठी, हे ओळखले पाहिजे. लोकप्रिय लेखनापेक्षा समाज ढवळणाºया व प्रक्षोभ निर्माण करणाºया साहित्यातून समाजपरिवर्तन होईल.
डॉ. कुंभार म्हणाले, लिहिण्याचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा आहे. कोरेगाव-भीमा संघर्ष, शेतकºयांच्या समस्या साहित्यातून उमटल्या पाहिजेत.
धनदत्त बोरगावे यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सीमाभागातील कवी सहभागी होते. ‘मोक्ष’ हे सांगली विभागीय राज्य नाट्य स्पर्धेतील परितोषिक प्राप्त नाटक सादर करण्यात आले. प्रतिभा जगदाळे, (चंदनवृक्ष), अरुण इंगवले (अबूट घेºयातील सूर्य), आप्पासाहेब पाटील, (तडजोड) आणि डॉ. व्ही. एन. शिंदे (एककांचे मानकरी) यांना श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते चैतन्य शब्दांगण साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, संस्थापक, अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्रा. वैजनाथ महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष गणेश माळी यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले. शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी आभार मानले. साहित्य व नाट्यरसिकांचा संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला.