सांगलीच्या अवकाशात भिरभिरताहेत विनापरवाना ड्रोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:48+5:302021-07-25T04:22:48+5:30
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : छायाचित्रण व्यवसायात स्पर्धा आली, तशी नवनवी तंत्रेही आली. ड्रोनद्वारे छायाचित्रण त्यापैकीच एक. विशेष ...
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : छायाचित्रण व्यवसायात स्पर्धा आली, तशी नवनवी तंत्रेही आली. ड्रोनद्वारे छायाचित्रण त्यापैकीच एक. विशेष म्हणजे ड्रोन वापरासाठी परवाना घ्यावा लागतो याची माहिती असुनी दुर्लक्ष केले जाते. सांगलीच्या अवकाशात अनेक विनापरवाना ड्रोन सध्या भिरभिरताहेत.
सर्वसामान्यांच्या तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्रास विनापरवाना वापरात आहेत. लग्नाचे जंगी सोहळे तसेच जाहीर सभा-समारंभांमध्ये डोक्यावरून भिरभिरणारी ड्रोन्स विनापरवानाच असतात. त्याच्या वापरासाठी परवाना घ्यावा लागतो, याबाबत संयोजकही अनभिज्ञ असतात. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी सर्व ड्रोनधारकांना नोटिसा काढल्या होत्या.
बॉक्स
अनेकदा अपघात, तरीही वापर सुरुच
ड्रोनच्या वापराचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नसतानाही अनेकजण वापर करतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झालेत. काही वर्षांपूर्वी एका लग्नात थेट वरपित्याच्या डोक्यावरच ड्रोन आदळला होता. किरकोळ जखमी वधुपित्याला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. एका जाहीर सभेतही अडथळ्यावर आदळून ड्रोन जमीनदोस्त झाला होता. विशेष म्हणजे या सभेला पोलीस बंदोबस्तही होता, तरीही कारवाई झाली नाही.
बॉक्स
ड्रोन उडवायचाय?, परवाना हवाच
- ड्रोन उडवायचा असेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस खाते आणि महापालिकेचा परवाना सक्तीचा आहे.
- परवानगी सक्तीचा असल्याबाबतचे आदेश खुद्द राज्याच्या पोलीस महासंचालकांनीच काही वर्षांपूर्वी काढले आहेत.
- पण ड्रोन म्हणजे कॅमेऱ्याचाच एक भाग असल्याच्या भावनेत पोलिसांसह सारेच परवानगी गृहीत धरतात.
ड्रोन वापरायचा तर हे पहा नियम
ड्रोनचा वापर थेट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने संवेदनशील भागात ड्रोन उडवण्यावर निर्बंध आहेत. पोलिसांची व प्रशासनाची कार्यालये, विमानतळ, महत्त्वाची रुग्णालये, प्रयोगशाळा, संरक्षणविषयक संस्था, समुद्रकिनारे आदी ठिकाणी ड्रोन उडवता येत नाही. तो उडविण्यासाठी प्रशिक्षत व प्रमाणपत्रधारक कर्मचारी आवश्यक आहे. ड्रोनचे वजन, त्यामुळे होणारे अपघात, रहिवासी इमारतींवर उडविण्यासाठी आवश्यक उंची याविषयी अनेक नियम पाळावे लागतात.
बॉक्स
एका शुटिंगचा खर्च लाखांवर
- स्टाइलनुसार एका ड्रोन शुटिंगचा खर्च काही लाखांपर्यंत जातो. प्री-वेडिंग शुटींगला सध्या बरीच मागणी आहे.
- सिनेस्टाइल शुटिंगसाठी लागणारे कसब आणि मनुष्यबळ पाहता याचा खर्चही काही लाखांच्या घरात जातो.
- कार्यालयातील पारंपरिक लग्नसोहळ्याचे ड्रोन छायाचित्रण मात्र २० ते ५० हजारांपर्यंत होऊ शकते.
कोट
प्रत्येक ड्रोन जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवावा लागतो. जिल्ह्यात अंदाजे ४०० ते ५०० ड्रोन आहेत. त्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो. गैरवापर कधीही झालेला नाही. प्रशिक्षण फक्त पुणे आणि दिल्लीत उपलब्ध असल्याने टाळले जाते.
- श्रीराम जाधव, सदस्य, ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशन, इस्लामपूर