चीनमधील कोरोना साथीमुळे राज्यात अभूतपूर्व मकाटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:14 PM2020-02-25T14:14:31+5:302020-02-25T14:15:16+5:30
उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व मका टंचाईला तोंड देत आहे. गेल्या मेपासून ही स्थिती आहे. चीनमधील कोरोनाच्या फैलावाने आयात शून्यावर आल्याचाही फटका बसला आहे.
संतोष भिसे
सांगली : उद्योग क्षेत्र सध्या अभूतपूर्व मका टंचाईला तोंड देत आहे. गेल्या मेपासून ही स्थिती आहे. चीनमधील कोरोनाच्या फैलावाने आयात शून्यावर आल्याचाही फटका बसला आहे.
टंचाईमुळे स्टार्च, ग्लुकोज, मकाचुनी आणि पशुखाद्य उद्योग मंदीच्या गर्तेत आहेत. मार्चमध्ये नवा मका बाजारात येईपर्यंत टंचाई कायम राहणार आहे. मकाशेती व प्रक्रिया उद्योग वर्षभरापासून संकटांना तोंड देत आहेत. गेल्यावर्षी लष्करी अळीने मका भुईसपाट केला. जुलैपासून अतिवृष्टी व महापुराचा फटका बसला. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेला थोडाफार मका निकृष्ट दर्जाचा होता. आता नव्या हंगामाकडे उद्योग क्षेत्राचे डोळे लागले आहेत.
गेल्या काही वर्षांत देशांतर्गत मका बाजारपेठ चीनने काबीज केली. चांगला दर्जा आणि तुलनेने स्वस्ताईमुळे त्याला पसंती मिळते. पण सध्या कोरोनामुळे आयात ठप्प झाली आहे. ब्रॉयलर कोंबड्यांमुळे कोरोनाच्या फैलावाच्या अफवेने पोल्ट्रीक्षेत्रही थंडावले. मका भरड्याची मागणी खालावली. त्यामुळे मागणीही नाही व पुरवठाही नाही, अशी विचित्र अवस्था आहे.
शासनाने १ हजार ७५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे, पण १ हजार ९०० भाव देऊनही पुरेसा चांगला मका बाजारात नाही. सांगली-कोल्हापुरात प्रामुख्याने औरंगाबाद, जळगाव, येवला तसेच विजापूर, बागलकोट, बेळगाव, बिहार आणि मध्य प्रदेशातून मका येतो. त्याची गतवर्षी साठेबाजी झाली. पुढीलवर्षी चढ्या भावाने विकण्याचे नियोजन केले. पण तो खराब होऊ लागल्याने ऐनवेळी बाजारात आणावा लागला. साहजिकच दर ढासळत गेले.