लोकशाहीच्या मजबुतीसाठी शहरी मतदारांनी मतदान टक्का वाढवावा : स्मृती मानधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:34 AM2019-04-08T10:34:10+5:302019-04-08T10:35:11+5:30
ग्रामीण मतदानापेक्षा शहरी मतदानाचा टक्का कमी आहे. लोकशाही मजबुतीसाठी हे फार चांगले नसून, शहरी मतदारांनी मतदानाच्या हक्काविषयी जागरुक होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करावे,
सांगली : ग्रामीण मतदानापेक्षा शहरी मतदानाचा टक्का कमी आहे. लोकशाही मजबुतीसाठी हे फार चांगले नसून, शहरी मतदारांनी मतदानाच्या हक्काविषयी जागरुक होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने सांगलीत केले.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सांगलीतील कल्पदु्रम क्रीडांगणावर आयोजित कार्यक्रमात मानधना बोलत होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, उपायुक्त मोसमी बर्डे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते. मतदान जागृतीची ज्योत स्मृती मानधना हिच्याहस्ते प्रज्वलित करून खेळाडूकडे दिली. ही ज्योत जिल्ह्यात सर्वत्र फिरणार असून, दि. २३ एप्रिलला पुन्हा सांगलीत येणार आहे. अभियानानिमित्त सांगलीत रॅलीही काढली. स्मृती मानधना म्हणाली की, क्रिकेटमध्ये प्रत्येक ‘रन’ला महत्त्व असते, त्याचप्रमाणे लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मताला महत्त्व आहे. यासाठी सर्व मतदारांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याची गरज आहे. आपले एक मत चांगल्या लोकप्रतिनिधीच्या हाती देशाची सूत्रे देऊ शकते. ग्रामीण भागाबरोबर शहरातील मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, मागील काही निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, शहरी भागातील मतदानाचा टक्का कमी असून, ही बाब चिंतेची आहे. प्रशासन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मतदारांनीही जागरुक राहून मतदानाचा हक्क बजावावा.
अभिजित राऊत म्हणाले की, प्रशासन गेल्या पंधरा दिवसांपासून मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न केला पाहिजे. जागरुक मतदारांनीही मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी आभार मानले.