उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी जीवाणू खते वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:08+5:302021-03-09T04:29:08+5:30
पलूस : ऊस हे बारमाही पीक आहे. या पिकाचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे ...
पलूस : ऊस हे बारमाही पीक आहे. या पिकाचे शाश्वत उत्पादन घेण्यासाठी जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आवाहन कोल्हापूरचे ऊस तज्ज्ञ विकास पाटील यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डाॅ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी अध्यक्षस्थानी होते.
विकास पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस पीक घेतो. उसाच्या सतत लागवडीमुळे व बदलत्या हवामानामुळे जमिनीची सुपीकता घटत आहे. आपला भाग उष्ण कटिबंधात येत असल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब नष्ट होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्बाच्या पुनर्भरणासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. तथापि आपण वापरलेली खते पिकांना उपलब्ध स्वरूपात मिळण्यासाठी जमिनीतील जीवाणूंचे कार्य आवश्यक आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, पोपट संकपाळ, संदीप पवार, कुंडलिक थोरात, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, अशोक पवार, लक्ष्मण ठोंबरे, धनंजय कुलकर्णी, संजय आंबी, मुकुंद जोशी उपस्थित होते. विलास जाधव यांनी आभार मानले.