मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा इतर कारणांसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:54+5:302021-01-13T05:06:54+5:30
मिरजेत रंगमंचावर पदार्पण करणाऱ्या नटसम्राट बालगंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिरजेत उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. सुमारे पाच कोटी रुपये ...
मिरजेत रंगमंचावर पदार्पण करणाऱ्या नटसम्राट बालगंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिरजेत उभारलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नाट्यगृहात नाट्यप्रयोगच होत नसल्याने नाट्यगृहाचा हत्ती पोसणे महापालिकेस अडचणीचे ठरले आहे. बालगंधर्व नाट्यगृहाची मोठी दुरवस्था झाल्याने राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्यगृहाची तात्पुरती डागडुजी करण्यात येते. नाट्यगृहातील रंगभूषा, वेशभूषा कक्ष अस्वच्छ आहे. ध्वनियंत्रणा, प्रकाशव्यवस्था नाही. नाट्यगृहातील खिडक्यांची व आसनांची मोडतोड झाली आहे. वीज बिल परवडत नसल्याने बंद असलेली वातानुकूलित यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे.
व्यावसायिक नाटकांसाठी आकारण्यात येणारे नाट्यगृहाचे भाडे स्थानिक हौशी नाट्यसंस्था, बालनाट्यसंस्थांना परवडत नसल्याने येथे नाट्यप्रयोगांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. नाट्यगृह सुधारणेसाठी महापौरांनी नियुक्त केलेल्या समितीने नाट्यगृहात आवश्यक असलेल्या सुविधा व देखभाल-दुरुस्तीबाबत समितीने महापालिका प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. महापालिकेस शासनाकडून मिळणाऱ्या शंभर कोटी विकास निधीतून बालगंधर्व नाट्यगृहासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यांपैकी ८८ लाख खर्चून नूतनीकरणाचे काम गेले वर्षभर सुरू आहे. मात्र केवळ रंगरंगोटी व आसनांची दुरुस्ती करण्यात येत असून ध्वनियंत्रणा, प्रकाशव्यवस्था यांसह नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक सोयी नसल्याने बालगंधर्व नाट्यगृहात नाटकांऐवजी इतर गोष्टीच होणार असल्याचे नाट्यप्रेमींचे म्हणणे आहे.
कोट
बालगंधर्व नाट्यगृहाची दुरवस्था दूर करण्यासाठी मिरजेतील नाट्यप्रेमी व नाट्यरसिक महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी आयुक्तांनी नाट्यगृहात बैठक घेऊन नाट्यगृहासाठी आवश्यक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. नाट्यकलेस प्रोत्साहन मिळावे यासाठी येथे नाटकांच्या तालमींनाही जागा मिळावी.
- धनंजय जोशी, अध्यक्ष, इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज
फोटो-१०मिरज३