‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांत उत्तरप्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
By अविनाश कोळी | Published: March 26, 2024 04:55 PM2024-03-26T16:55:53+5:302024-03-26T16:56:44+5:30
‘वैद्यकीय’च्या स्पर्धेत मुलीच अधिक
सांगली : ‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून २८ लाखावर अर्ज दाखल झाले होते. अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळल्यानंतर आता २३ लाख ८१ हजार ८३३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्वाधिक ३ लाख ३९ हजार २२५ अर्ज दाखल झाले असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
देशातून यावेळी ‘नीट’साठी २८ लाखावर अर्ज दाखल झाले होते. यातील २३ लाख ८१ हजार ८३३ विद्यार्थ्यांनीच परीक्षा फी भरल्याने व आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोट केल्याने ते परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. गतवर्षी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्या २० लाख ८७ हजार ४६२ इतकी होती. म्हणजेच यावर्षी नीटसाठी विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ९४ हजार ३७१ ने वाढलेली आहे.
‘वैद्यकीय’च्या स्पर्धेत मुलीच अधिक
वैद्यकीय शाखेकडे मुलींचा कल वाढला आहे. नीटसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या १० लाख १८ हजार ५९३, तर स्त्री अर्जदारांची संख्या १३ लाख ६३ हजार २१६ इतकी आहे. यंदा तृतीयपंथी उमेदवारांची संख्या २४ आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ‘नीट’साठी अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्पर्धा वाढत आहे. गेल्या काही वर्षात वैद्यकीय शाखेच्या जागाही वाढत आहेत. उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातून अधिक अर्ज दाखल होत असतात. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक, सांगली