लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, आकाशवाणीचे निवृत्त निवेदक प्रकाश गडदे (वय ६०) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गौडवाडी (ता. सांगोला, जि. सोलापूर) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
गडदे नुकतेच सांगली आकाशवाणीतून निवेदक पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी आकाशवाणीत २५ वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावली. उत्कृष्ट लेखक, निवेदक व दिग्दर्शक म्हणून ते सर्वपरिचित होते. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक पथनाट्ये, एकांकिका बसवल्या. युवा महोत्सवांमध्ये त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. १९८६ मध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पथनाट्य महोत्सवात त्यांनी ५० प्रयोग केले होते. ‘बिकट वाट-वहिवाट’ या नाटकातून त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत प्रवेश केला. सांस्कृतिक कला मंच या संस्थेच्या माध्यमातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी धुम्मस, बेबी, एक चादर मैलीसी, बनगरवाडी, पांगिरा, डफ या नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. या नाटकांनी पारितोषिके पटकावली होती. त्यांची ‘डफ’ आणि ‘एक चादर मैलीसी’ ही नाटके गाजली होती. ‘मेला तो देशपांडे’, ‘हॅलो अंजू’, ‘दि ग्रेटेस्ट सॉव्हरीन’, ‘दि एस्केप’ यासह त्यांच्या अनेक एकांकिकांनाही पारितोषिके मिळाली होती. बालनाट्य, एकांकिका आणि नाटकांमधून त्यांनी असंख्य कलाकारांना घडवले. काही चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला. नभोनाट्य या कलाप्रकारात त्यांचा हातखंडा होता. सेवानिवृत्तीपूर्वी ते सांगली आकाशवाणीमध्ये नभोनाट्य विभागाची जबाबदारी सांभाळत होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गडदे यांची जगाच्या रंगमंचावरून झालेली ‘एक्झिट’ रसिकांच्या मनाला चटका लावून गेली.