सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे.सोशल मिडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या वीस विनोदांपैकी एक विनोद अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगली पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , स्थानिक घडामोडींनाही सांगली पोलिसांशी यानिमित्ताने जोडण्यात आले आहे.
विजय माल्याची भारतात परतून पोलिसांना शरण जाण्याची इच्छा आहे, पण त्याची अट एकच आहे की, मला सांगली पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. दाऊद इब्राहिमनेही अशाच प्रकारची अट भारताकडे केल्याचा विनोद व्हायरल झाला आहे.कोथळे खूनप्रकणापूर्वीही याच पोलिस ठाण्यात कामटे व अन्य काही पोलिसांच्या छळाला अनेक नागरिकांना सामोरे जावे लागले होते. मानसिक व आर्थिक पिळवणुकीच्या काही कहाण्या समोर येतात, तर काही दडपल्या जातात. त्यामुळे कोथळे प्रकरणानंतर अशा लोकांनी सोशल मिडियाचा आधार घेत पोलिसांच्या क्रूरतेवर व छळवणुकीवर बोट ठेवले.
टीकेपेक्षाही हे विनोद आता पोलिसांना लागत आहेत. काही पोलिसांनी या विनोदांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होत असल्याची खंतही व्यक्त केली आहे. सगळेच पोलिस असे क्रूर नसतात असा सूर उमटत असला तरी कोथळे प्रकरणानंतर लोकांचा राग आंदोलनाबरोबरच सोशल मिडियावरील विनोदांमधूनही स्पष्ट होऊ लागला आहे.