जत : जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातून तीस लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा करून आमदार विक्रम सावंत यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
बिनविरोध ग्रामपंचायतीला ३० लाख रुपये देण्याचा अधिकार आमदारांना नाही. राज्य शासनाकडून असा कोणताही नियम करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशी घोषणा आमदार विक्रम सावंत यांना करता येणार नाही. असे सांगून विलासराव जगताप म्हणाले की, एका बाजूला निवडणुका लावा म्हणून आमदार विक्रम सावंत मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला निवडणुका बिनविरोध करा, असे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. मतदारांना त्यांनी बक्षीस देण्याचे प्रलोभन दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. लहान व मोठी ग्रामपंचायत यांच्यात तफावत असते, मग बिनविरोध ग्रामपंचायतीला तीस लाख रुपयांचा निधी आमदार कसा काय देणार आहेत? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, विकास कामांसाठी आराखडा तयार असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाचे नियम आहेत. ग्रामपंचायत व नागरिकांनी कामाची मागणी केली पाहिजे, त्यानंतर निधी वाटप शासन नियमानुसार होत असते. बक्षीस देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे कोणत्याही वेगळ्या फंडाची शासनाकडून तरतूद करण्यात येत नाही. आमदार विक्रम सावंत यांनी जनतेला प्रलोभन दाखविण्यासाठी ३० लाख रुपयांची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी कुंडलिक दुधाळ, रावसाहेब मोटेे उपस्थित होते.