विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले
By अशोक डोंबाळे | Published: April 25, 2024 05:22 PM2024-04-25T17:22:51+5:302024-04-25T17:24:21+5:30
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार
सांगली : महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठीच सांगलीत आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे. तो दिल्लीला पाठविणार असून, तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच देशात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सांगलीतील गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, आम्ही सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अहवालावर दिल्लीतून जो निर्णय होईल, त्यानुसार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्हीही दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांपर्यंत प्रयत्न केले. पण, देशातून भाजप हटविण्यासाठी सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडी केली आहे. त्यानुसार सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेली आहे. म्हणून महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करतील. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत; मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे.
देश कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपचे
देशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना त्रास देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप येता कामा नये यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत वारंवार ४०० पार जागांची घोषणा होते. या जागा त्यांना केवळ देशाचे संविधान बदलण्यासाठीच गरजेच्या आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
संविधान वाचवणे काँग्रेसची जबाबदारीच
काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही हतबल नाही आहोत, देशाचं स्वातंत्र्य आणि देशाच्या संविधान निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळे ते वाचवणे हीदेखील काँग्रेसचीच जबाबदारी आहे. आम्हाला लोभापेक्षा देश महत्त्वाचा. त्यामुळे काँग्रेसचाच कार्यकर्ता निवडणुकीत पुढे असेल. एकदा जागावाटप झाल्यानंतर हे सगळे विसरावे लागते, असेही नाना पटोले म्हणाले.