खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी
By हणमंत पाटील | Published: February 29, 2024 08:39 PM2024-02-29T20:39:27+5:302024-02-29T20:40:34+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे.
कवठे एकंद: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. सध्याचे खासदार संजय पाटील यांच्या तासगावच्या होम पिचवर लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विरोधकांनी गाठीभेटीचा धडाका लावला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा वाढता आलेख लक्षात घेता जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या प्रत्येक गावात गट आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा पाठपुरावा करताना त्यांनी स्वतःची वेगळी छाप कार्यकर्त्यांच्यावर टाकली आहे. याच पाठबळावर संजय पाटील यांनी यंदा खासदारकीची हॅट्रिक करण्याचे मनसुबे आखले आहेत.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली जिल्हयात वसंतदादा पाटील घराण्याचा चागलाच दबदबा होता. या पार्श्वभूमीवरच नातू विशाल पाटील यांनी पुन्हा नव्या उमेदीने खासदारकीसाठी शड्डू ठोकला आहे. विशाल पाटील यांनी बुधवारी खासदार पाटील यांच्या होमपीचवर म्हणजेच चिंचणी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांना भेटी देत कार्यकर्ते व लोकांशी संवाद साधला. जुन्या - नव्या काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस , अन्य समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करीत खासदारांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. त्यांच्या कुटुंबियांनीही विविध गावागावत गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
पैलवानाचा राजकीय आखाड्यात शड्डू...
दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील राजकीय आखाड्यात शड्डू ठोकण्याचे निश्चित केले आहे. गावच्या यात्रेतील कुस्ती मैदाने, बैलगाडी शर्यती व रक्तदान शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकांशी संवाद वाढवला आहे. तासगाव तालुक्यातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, तसेच कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा अन्य कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीकडून चाचपणी...
लोकसभा निवडणुकीत यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने ही उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. एकूणच लोकसभेच्या निमित्ताने खासदार संजय काका पाटील यांना शह देण्यासाठी विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांनी बैठकावर जोर लावला आहे.