सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ
By अशोक डोंबाळे | Published: April 16, 2024 06:24 PM2024-04-16T18:24:49+5:302024-04-16T18:25:35+5:30
सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय ...
सांगली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी मंगळवारी बंड करीत कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा घेतला. मेळाव्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित नव्हते. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्राधान्याने हजेरी होती.
वसंतदादा घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या रूपाने वसंतदादा घराण्याचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अखेरपर्यंत सांगली लोकसभेची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी, यासाठी जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर-जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांनी दिल्लीपर्यंत आपली प्रतिष्ठा पणाला लावली. पण, शेवटी उद्धवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी मैदान मारले. हे कसे घडले आणि यामागे कोण ? यापेक्षा आता लढण्यासाठी सोबत कोण? हे मोठे प्रश्नचिन्ह विशाल यांच्यासमोर उभे आहे.
कॉंग्रेस पदाधिका-यांची भूमिका काय ?
विश्वजीत कदम असोत अथवा पृथ्वीराज पाटील, विशाल यांच्यासाठी ही मंडळी आपले पद पणाला लावतील का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशाल काँग्रेसतर्फे रणांगणात असते तर, या साऱ्यांची एकसंघ ताकत पाठीशी उभी राहिली असती. परंतु आता विशाल यांना काँग्रेस श्रेष्ठींच्या भूमिकेमुळे अपक्ष लढावे लागणार आहे. अशावेळी पदावरील ही मंडळी उघडपणे विशाल यांच्या पाठीमागे उभी राहतील, ही शक्यता धूसर आहे. म्हणूनच नेते महाआघाडीच्या स्टेजवर, कार्यकर्ते विशाल यांच्या पाठीशी हे चित्र मंगळवारी झालेल्या मेळाव्यातून दिसून आले.
माझे पक्षावर एकतर्फी प्रेम
मी स्वार्थासाठी लढत नाही, तर २००५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मला उमेदवारी भेटली नाही, पण मी थांबलो. आजपर्यंत थांबलोय, मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले की काय, असेही विशाल पाटील या मेळाव्यात म्हणाले.