लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : विश्वासराव नाईक कारखान्याच्या २०२०-२१ गळीत हंगामत ज्या तोडणी मजुरांचा अपघात होऊन इजा पोहोचली होती. त्यांना आज विम्याचे धनादेश वाटप अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
चिखली (ता. शिराळा) येथील कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात हे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थितीत होते. कारखान्यामार्फत दरवर्षी करार करणाऱ्या तोडणी, वाहतूक मजुरांचा विमा उतरवण्यात येतो. गळीत हंगाम काळात अपघात झाल्यास त्याला विम्याचा लाभ मिळतो. त्याप्रमाणे भीमराव श्यामराव पाटील (रिळे, ता. शिराळा) यांना ३० हजार रुपये व महादेव रामचंद्र खोत (रा. लादेवाडी) यांना ५ हजार ९६३ रुपयांचे धनादेश प्राप्त झाले. ते त्यांना देण्यात आले. हंगाम काळात ऊस वाहतूक करत असताना या दोघांना अपघात झाला होता.
यावेळी संचालक सर्वश्री विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, बिरुदेव आमरे, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील आदी उपस्थित होते.