नव्या वर्षात शिराळा उपजिल्हा रुग्णालयाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:23+5:302020-12-31T04:26:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली नऊ महिने कोरोना रुग्णांमुळे गजबजलेले उपजिल्हा रुग्णालय कोरोनामुक्त झाले आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली नऊ महिने कोरोना रुग्णांमुळे गजबजलेले उपजिल्हा रुग्णालय कोरोनामुक्त झाले आहे. या रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण उपचार घेत नाही. त्यामुळे आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सर्व रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय सुरू होणार आहे. ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे.
कोरोनाच्या काळात शिराळा तालुका सुरुवातीस हॉटस्पॉट बनला होता. यामध्ये प्रामुख्याने मणदूर, शिराळा, शिराळे खुर्द आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास रावळ, डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकाने योग्य नियोजन केले. यामुळे ३५ हजारपेक्षा जास्त मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून आलेले नागरिक असूनही कोरोनाला तालुक्यात थोपवू शकले.
उपजिल्हा रुग्णालय ७५ व कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयात २५ कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात येत होते. हे सर्व बेड ऑक्सिजन बेड आहेत. याठिकाणी बेड शिल्लक मिळतील, या अपेक्षेने सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येत होते. याठिकाणी कोविड रुग्णालय सुरू केल्याने येथील इतर रुग्णांवर उपचाराकरिता जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या लहान जागेत रुग्णालय सुरू केले होते. आमदार नाईक यांनी येथील रुग्णालयात ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन टॅंक, व्हेंटिलेटर याची तातडीने सोय केली. आता ही सुविधा इतर रुग्णांनाही फायदेशीर ठरणार आहे.
चाैकट
आशादायक चित्र
उपजिल्हा रुग्णालय आता सर्वच रुग्णांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. यामुळे तालुक्यात आरोग्य सेवेबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आता येथील सेवेची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.