विट्यात नगरसेवकांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:27 AM2021-05-18T04:27:17+5:302021-05-18T04:27:17+5:30
विटा येथे सत्ताधारी नगरसेवकांनी सोमवारी महावितरणसमोर धरणे आंदोलन करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ...
विटा येथे सत्ताधारी नगरसेवकांनी सोमवारी महावितरणसमोर धरणे आंदोलन करीत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोगाव योजनेचा आळसंद व घोगाव येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला.
विटा शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी कृष्णा नदीतून घोगाव येथून नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आळसंद येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरण करून पुढे शहराला पुरवठा केला जातो. मात्र, घोगाव व आळसंद या दोन्ही ठिकाणी विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दोन महिन्यापासून शहराला पूर्ण दाबाने व नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी विटा पालिका प्रशासनाला जाब विचारल्यानंतर त्यांनी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे सांगितले.
सत्ताधारी नगरसेवकांनी महावितरणला लेखी पत्र देऊन वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, अन्यथा सोमवारी महावितरणसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार नगरसेवक किरण तारळेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी, अविनाश चोथे, विनोद पाटील, प्रशांत कांबळे यांनी धरणे आंदोलन केले. त्यावेळी कार्यकारी अभियंता सुनील कदम व उपअभियंता विशाल ग्रामोपाध्ये यांना आंदोलकांनी घेराव घातला. अधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी दालनात बोलावले.
तारळेकर यांनी महावितरणच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले.
चौकट
वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत
कार्यकारी अभियंता कदम म्हणाले की, कार्वे व कुंडल येथून घोगाव आणि आळसंद येथील केंद्राला स्वतंत्र वीज देण्याचे नियोजन करण्यात आले असून, पुरवठा नियमित सुरू राहील, याची काळजी घेतली जाईल. या दोन्ही वाहिन्यांवर काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोन दिवसांत शहराला नियमित पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.