विट्यात पोलीस अधिकाऱ्यासह तिघे लाखाची लाच घेताना जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:11+5:302021-03-27T04:28:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : अटकेतील संशयितास सहकार्यासाठी आणि वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी एक लाखाची लाच घेताना सहायक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : अटकेतील संशयितास सहकार्यासाठी आणि वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी एक लाखाची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पोपट झालटे, पोलीस शिपाई विवेक पांडुरंग यादव व त्यांचा पंटर अकीब फिरोज तांबोळी (वय २३, रा. विटा) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. यादव व तांबोळीला अटक करण्यात आली असून, झालटे फरार झाला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल एकाविरुध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयितास अटक करण्यात आली आहे. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करीत असून, त्याला यादव मदत करीत आहे. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व वाढीव पोलीस कोठडी न मागण्यासाठी झालटे व यादव यांनी संशयिताच्या दिवाणजीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख रुपये दि. २६ मार्च रोजी आणून देण्यास सांगितले होते.
याबाबत दिवाणजीने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विटा पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा लावला. झालटे, यादव यांनी तक्रारदाराकडे दीड लाखाची मागणी केली. तसेच यादवच्या सांगण्यावरून अकीब तांबोळी याने तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. मात्र यातील सहायक पोलीस निरीक्षक झालटे फरार झाला आहे.
पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, संजय कलगुटगी, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, संजय संकपाळ, सलीम मकानदार, भास्कर मोरे, राधिका माने, रवींद्र धुमाळ, सीमा माने, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.